दिवाळीच्या काळात झालेल्या गर्दीमुळे करोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा धोका ओळखून मुंबई पालिकेकडून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले, परंतु मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करूनही बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी करोनाबाधितांचा दर ५.०३ पर्यंत खाली घसरला. हा आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे.

मुंबईत २५ नोव्हेंबर रोजी १९ हजार १८ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील १२७२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्यावेळी बाधित रुग्ण सापडण्याचा दर ६.६९ टक्के इतका होता. तर २९ नोव्हेंबरला १० हजार ५३८ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ७२१ म्हणजेच ६.८४ टक्के जण बाधित आढळले. त्यानंतर मात्र, चाचण्यांचे प्रमाण वाढूनही बाधितांचा दर कमीच होत राहिला. ४ डिसेंबरला १६ हजार ३९४ चाचण्या केल्या, त्यात ८२५ म्हणजेच ५.०३ टक्के बाधित आढळले. मार्च महिन्यापासूनचा हा सर्वात कमी दर आहे.

४ डिसेंबरला केलेल्या प्रतिजन चाचण्यांमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण कमी आढळले. त्यामुळे या दिवसाचा करोना दर कमी आहे. या दिवशी ८ हजार ८६७ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. त्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये ८ हजार १५५ पैकी ७ टक्के, सरकारी प्रयोगशाळांमध्ये १७३ पैकी ३१ टक्के आणि पालिकेच्या प्रयोगशाळांमध्ये ५३९ पैकी ५ टक्के चाचण्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले आहेत, तसेच ७ हजार ५२७ प्रतिजन चाचण्या झाल्या. त्यात पालिकेच्या प्रयोगशाळेत ७ हजार १५५ पैकी दोन टक्के आणि खासगी प्रयोगशाळेत ३७२ पैकी ८ टक्के चाचण्यांमध्ये रुग्ण बाधित आढळले.

कोल्हापूरची करोनामुक्तीकडे वाटचाल

* राज्यात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा खाली आला असून शनिवारी चार हजार ९२२ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात पाच हजार ८३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

* राज्यात आतापर्यंत १७ लाख १५ हजार ८८४ रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८८ टक्क्यांवर पोहोचले आहे. कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासांत एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नसून या शहराची करोनामुक्तीकडे सुरू झालेली वाटचाल दिलासा देणारी आहे.

* राज्यात दिवसभरात ९५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या पाच लाख ६० हजार व्यक्ती गृहअलगीकरणात असून पाच हजार ८५५ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर विविध रुग्णांलयांमध्ये ८२ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिनांक  एकूण चाचण्या   करोनाबाधित बाधितांचा दर

२५ नोव्हेंबर  १९०१८  १२७२   ६.६९

२६ नोव्हेंबर  १७९७३  ११६७   ६.४९

२७ नोव्हेंबर  १६९०२  ११३६   ६.७२

२८ नोव्हेंबर  १४५९२  ९२२ ६.३२

२९ नोव्हेंबर  १०५३८  ७२१ ६.८४

३० नोव्हेंबर  ११७०६  ७५८ ६.४८

१ डिसेंबर   १६१५०  ९६० ५.९४

२ डिसेंबर   १५३९९  ८८० ५.७१

३ डिसेंबर   १५८३२  ८२३ ५.२०

४ डिसेंबर   १६३९४  ८२५ ५.०३

करोना चाचण्यांमध्ये बाधित आढळणाऱ्यांच्या दराबाबतचे आश्वासक चित्र गेल्या दहा दिवसांत निर्माण झाले आहे. पण यावर आपण समाधानी न राहता स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत राहिले पाहिजे.

– इक्बालसिंग चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका