उमाकांत देशपांडे

राज्यातील मतदारांची संख्या ६५,३१,६६१ने वाढली असली तरी दक्षिण मुंबई वगळता पाच मतदारसंघांत २०१४च्या तुलनेत मतदारांची संख्या तब्बल ३,८६,८९१ने कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच गेल्या निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीशी तुलना करता यंदाचे मतदान काही ठिकाणी ३-६ टक्क्यांनी वाढले आहे. दक्षिण मुंबईत मात्र ६८,५६९ने मतदार वाढले.

मुंबईत २०१४ मध्ये सरासरी ५१.६ टक्के इतके मतदान झाले होते. त्यात या वेळी वाढ झाल्याचे दिसून येत असले तरी त्यास काही प्रमाणात दक्षिण मुंबई वगळता पाच लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांमध्ये झालेली घटही कारणीभूत आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारयाद्यांची पडताळणी करताना निधन झालेले, पत्ता बदललेले आणि दुबार नावे असलेले मतदार वगळले. त्यामुळे मतदारांची संख्या कमी झाली आहे. मतदार घटल्याने साहजिकच मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात वाढली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या आधी १० दिवसांपर्यंत नवीन मतदारांना नावे नोंदविण्याची संधी होती. त्यामुळे मतदारसंख्येत काही प्रमाणावर पुन्हा भर पडली, तरीही २०१४च्या तुलनेत मतदारांची संख्या कमी झाली आहे.

या वेळी पाच दिवस सलग सुट्टय़ा आल्याने मतदार बाहेरगावी गेल्याने मतदान कमी होण्याची भीती उमेदवारांना सतावत होती. उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक मतदार काही प्रमाणात बाहेरगावी गेल्याचे काही विभागांत दिसून आले. त्या तुलनेत मराठी-गुजराती, मुस्लीम, ख्रिश्चन आदींनी उत्साहाने मतदान केल्याने मुंबईत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले.