18 October 2018

News Flash

पावसामुळे प्रदूषणात घट

शुद्ध हवा यामुळे वातावरणात एक प्रकारे चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

थंडीचा जोर वाढल्याने वाढलेल्या हवाप्रदूषणाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना गेले दोन दिवस झालेल्या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. पावसामुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषित घटक ‘धुऊन’ निघाले असून प्रदूषणाची पातळी चांगलीच खालावली आहे. हवेत निर्माण झालेला सुखद गारवा आणि त्यासोबत शुद्ध हवा यामुळे वातावरणात एक प्रकारे चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्यातील उष्ण हवा हलकी असल्याने तिच्यात मिसळलेले प्रदूषित घटक हवेसोबत उंचावर जातात व प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. याउलट हिवाळय़ात प्रदूषित घटकांनी युक्त हवा जड झाल्याने ती उंचावर जाऊ शकत नसल्याने हवेच्या प्रदूषणात वाढ होते. त्यातच हिवाळ्याच्या दिवसात शेकोटय़ा पेटवण्याचे प्रकार वाढत असल्याने वायुप्रदूषणात भर पडते. गेल्या महिनाभरापासून मुंबईतील तापमानाचा पारा जसजसा खाली जात आहे, तसतशी हवेतील प्रदूषणात वाढ होत होती. मात्र ओखी वादळासोबत झालेल्या पावसाने जणू ही प्रदूषित हवाच धुऊन काढली!

‘सिस्टीम ऑफ एअर क्वॉलिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च’च्या (सफर) आकडेवारीनुसार गेल्या दोन दिवसांत हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या खाली आले आहे. मंगळवारी आणि बुधवारी शहरातील विविध भागांतील प्रदूषणाची पातळी निम्म्याहून खाली आली होती, असे ‘सफर’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. हीच परिस्थिती गुरुवारीही कायम राहील, असे ‘सफर’च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

First Published on December 7, 2017 2:35 am

Web Title: decrease mumbai pollution due to rain