आयुर्वेदिक औषधे तेजीत; ऐकीव माहितीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्याकडे कल

मुंबई : करोनापासून बचाव करण्यासाठी सुरुवातीच्या काळात मुखपट्टी आणि सॅनिटायझरला असलेल्या मागणीचा जोर सहा महिन्यांत बराच ओसरला असून त्या ऐवजी औषधालयांचा दर्शनी भाग आयुष काढ्यासारखी आयुर्वेदिक औषधे, भाज्या, फळे आदी निर्जंतुकीकरण करणारी रसायने, सी व्हिटॅमिनच्या गोळ्या यांनी व्यापला आहे. त्यातही आयुर्वेदिक औषधांचा बाजार चांगलाच तेजीत आहे.

मार्चमध्ये मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि मुखपट्ट्या, सॅनिटायझरला खूप महत्त्व आले. त्यामुळे दुकानांमध्ये या वस्तूंच्या खरेदीकरिता गर्दी उसळत असे. अवाच्या सव्वा मागणी वाढल्याने या वस्तूंची साठेबाजी, काळाबाजाराचे प्रकारही घडले. परंतु, त्यांचा वापर करूनही संसर्ग होतच आहे, म्हटल्यावर प्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे नागरिक लक्ष देऊ लागले आहेत. त्यातूनच मुखपट्टी, सॅनिटायझरसाठी लागणा ऱ्या रांगा विरल्या. आजारापासून बचाव करण्यासाठी आता करोना प्रतिबंधित गोळ्या, काढे, औषधे यांना मागणी असल्याचे औषध विक्रे ते सांगतात. त्यातही आयुर्वेदिक काढ्यांना अधिक मागणी आहे.

पाण्यात मिसळायला तुळशी अर्क, हळदी अर्क, गुडूची गोळ्या, च्यवनप्राश, आयुष काढा अशा विविध औषधांची जंत्री आयुर्वेदिक औषधालयात पाहायला मिळते. ‘लोकांचा आयुर्वेदावर विश्वाास असल्याने लोकांचा कल इथे या वस्तूंच्या खरेदीकडे अधिक आहे. लोक विविध उपचार जाणून घेतात आणि त्याबद्दल चौकशी करतात. आजही दिवसाला ७० ते १०० ग्राहक प्रतिकारशक्तीची औषधे घेऊन जातात,’ असे माटुंगा आयुर्वेदिकचे प्रतिनिधी सांगतात. तर ‘रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोक नाना औषधे वापरून पाहत आहेत.  त्यातल्या त्यात आयुष काढा सर्वपरिचित आहे. मागे वाहिन्यांवर जलनेती केल्याने करोनापासून बचाव करता येऊ शकतो असे काहीसे प्रसारित झाले. त्यानंतर जलनेती यंत्राचीही विक्री वाढली,’ अशी माहिती दादर फार्मसीचे किशोर कुरिया यांनी दिली.

‘कामानिमित आज बरेच लोक बाहेर पडत असले तरी मनातली भीती कमी झाली आहे. कार्यालयात सॅनिटायझरची सोय असल्याने वैयक्तिकरीत्या बाळगण्याचे प्रमाण कमी झाले. शिवाय मुखपट्टीही घरात बनवता येत असल्याने दोन्ही वस्तूंची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी घसरली. क जीवनसत्त्वाच्या गोळ्या, प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे यांना खूप मागणी आहे,’ असे शीव रुग्णालयाबाहेरील वेलनेस फोरेवर या मेडिकलचे व्यवस्थापक प्रदीप मांजरेकर यांनी सांगितले.

एन ९५ मुखपट्टीचे आकर्षण कमी

विशेष म्हणजे एन ९५ मुखपट्टीचे लोकांना असलेले आकर्षण कमी झाल्याचे औषध विक्रेते आवर्जून सांगतात. ‘करोनाच्या सुरुवातीच्या काळात थर्मामीटर, ऑक्सिमीटर अशा वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. परंतु आता ही मागणी पूर्ण ठप्प झाली आहे,’ असे केइएम रुग्णालयाबाहेरील नॅशनल मेडिकलचे रितेश पवार यांनी सांगितले. सुरुवातीला अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या घेण्यासाठी रीघ असायची. आता तोही माल पडून आहे, असेही त्यांनी नमूद केले.