21 September 2020

News Flash

सिनेमाने झपाटलेला माणूस

‘चित्रपट म्हणजे एक कुटुंब. कुटुंबाची व्यापक संकल्पना समजावून घेतली तर अपूर्णतेचा शोध घेता येतो. उणिवा भरून काढण्याचे प्रयत्न सुरू करता येतात.

| October 1, 2013 02:35 am

‘चित्रपट म्हणजे एक कुटुंब. कुटुंबाची व्यापक संकल्पना समजावून घेतली तर अपूर्णतेचा शोध घेता येतो. उणिवा भरून काढण्याचे प्रयत्न सुरू करता येतात. हेच तर मांडले आहे आपण ‘सावरखेडे..’पासून ते आजच्या ‘वंशवेल’पर्यंत’..
सामाजिक आशय मांडतानाही व्यक्तिगत संवेदना न सोडता चित्रपटातील प्रत्येक घटक कसल्या तरी शोधाच्या आंतरीक तळमळीने वावरतो, हे कौशल्य दिग्दर्शक, निर्माता राजीव पाटील यांनी लिलया साध्य केले. याची खुद्द त्यांनीच एका मुलाखती दरम्यान केलेली उपरोक्त कारणमिंमासा. सोमवारी त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी आली आणि नाटय़, कला व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाला जबरदस्त धक्का बसला.
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणारे राजीव कधी त्या क्षेत्रात रमलेच नाही. त्यांना वेड होते, ते नाटय़ क्षेत्राचे. नाशिकच्या प्रयोग परिवारापासून अतुल पेठेंबरोबर त्यांनी काम करायला सुरूवात केली. एकांकिका स्पर्धा, नाटुकल्या आणि नाटकाचे गट यातून सुरू झालेली त्यांची धडपड मराठी चित्रपट सृष्टीतील उत्तमोत्तम चित्रपटांच्या दिग्दर्शनापर्यंत येऊन धडकली. सिनेमा हा त्यांचा ध्यास होता आणि याच ध्यासातून त्यांनी मुंबई गाठले. काही काळ त्यांनी चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. २००४ साली आलेला ‘सावरखेड एक गाव’ हा राजीव पाटील यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला मराठी चित्रपट. श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे, उपेंद्र लिमये, विक्रम गोखले अशा कलाकारांना घेऊन केलेल्या ‘सावरखेड एक गाव’ या पहिल्याच चित्रपटातून राजीव पाटील यांनी आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडली. त्यानंतर ‘ब्लाइंड गेम’, ‘ऑक्सिजन’, श्रेयस तळपदेची निर्मिती असलेला ‘सनई चौघडे’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपट राजीव पाटील यांनी दिले. २००८ साली आलेल्या ‘जोगवा’ चित्रपटाने राजीव पाटील यांच्यातील संवेदनशील दिग्दर्शकाची मराठी चित्रपटसृष्टीला नव्याने ओळख झाली. ‘जोगवा’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली आणि त्यानंतर राजीव पाटील यांची वेगाने दौड सुरू झाली होती. २००९ साली ‘पांगिरा’ हा राजीवचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पुन्हा एकदा सामान्यांची कथाव्यथा मांडणारा हा चित्रपट समीक्षकांच्याही पसंतीस उतरला होता. ‘वंशवेल’ हा राजीवचा चित्रपट पूर्ण झाला असून प्रदर्शनासाठी सज्ज असून तो त्यांचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे. याशिवाय, राजीवने एका हिंदी चित्रपटाचे काम सुरू केले होते. त्याबरोबर झी समूहानेही त्यांच्याशी तीन चित्रपटांसाठी करार केला होता.
प्रवासातील गुरू अध्र्यावर  सोडून गेला-स्मिता तांबे
काय बोलू आणि कसे बोलू हेच सुचत नाही. राजीव पाटील गेल्याची बातमी समजली आणि पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला. नेहमी उत्साहाने खळाळून वाहणारा झरा अचानक आटल्यावर मनात जे वादळ उठते तेच वादळ राजीव पाटील यांच्या जाण्याने मनात उठले आहे. अभिनय कशाशी खातात हे त्यांनी मला पदोपदी शिकवले. ते केवळ उत्तम दिग्दर्शकच नव्हते; तर उत्तम माणूस म्हणूनही ते नेहमी सर्वाना आपलेसे वाटत होते. अशी ही गुरुस्थानी असलेली व्यक्ती मात्र प्रवासात अध्र्यावरच साथ सोडून गेली आहे.
चित्रपटातील मृत्यूचा प्रसंग दुर्दैवाने वास्तवात उतरला -किशोर कदम
माझ्यातील अभिनेत्यावर प्रचंड विश्वास दाखवून आपल्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका देणारा माझा दिग्दर्शक, मित्र, हितचिंतक गेला. वेगळे विषय आणि रसिकांची आवड या दोन्ही गोष्टींची अप्रतिम सांगड घालून कलाकृती पडद्यावर मांडणारा राजीव पाटील हा द्रष्टा दिग्दर्शक होता. दुबेजींच्या प्रशिक्षणातील आम्ही दोघेही होतो. अगदी नाशिकपासून त्याचे काम मी पाहत आलो होतो. तोसुद्धा वर्षांनुवर्षे पडद्यावर, नाटकातील माझी कामगिरी पाहत असे. जोगवा, पांगिरा आणि पुढील महिन्यात प्रदर्शित होणारा ‘वंशवेल’ यामध्येही वेगळ्या भूमिका करण्याची संधी त्याने मला दिली. विचित्र योगायोग म्हणजे एका चित्रपटाचे चित्रिकरण दुपारी भोर स्टुडिओमध्ये करीत होतो. प्रसंग स्मशानातला आणि मी मरतो आणि मला तिरडीवर ठेवतात असा होता. हा प्रसंग आज करायचा आहे हे कालपासूनच माहीत होते. ‘जोगवा’मधील प्रसंगाची आणि आपसूकच राजीवची आठवण मला लगेच झाली. दैवदुर्विलास हा की हा प्रसंग चित्रिकरणासाठी तयार होत असतानाच राजीवच्या निधनाची बातमी समजली. सर्वसाधारणपणे अंत्यसंस्कारासारख्या गंभीर प्रसंगात अभिनय करण्यापूर्वी आम्ही कलावंत अधिक विनोद, गमतीजमती करतो. परंतु, आज मात्र या गंभीर प्रसंगाचे चित्रण अधिकच शोकाकूल वातावरणात करावे लागले.
नाशिककर शोकमग्न
 राजीव पाटील (४१) यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी चित्रपट लेखक दत्ता पाटील, सदानंद दाते, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह नाटय़-चित्रपट, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी धाव घेतली. त्यांच्या समवेत काम करणाऱ्या कित्येकांना अश्रू रोखणे अनावर झाले.   

मकाऊमध्ये दु:खाची छाया
राजीव पाटील यांच्या निधनाची बातमी सोमवारी सायंकाळी समजताच मिक्ता (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अ‍ॅवॉर्ड्स) सोहळ्यानिमित्त मकाऊ येथे जमलेल्या सगळ्यांवर दु:खाची छाया पसरली. सगळ्यांनी राजीव पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, दिलीप प्रभावळकर, सुनील बर्वे, उपेंद्र लिमये, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी मोने, स्वप्निल जोशी, उदय सबनीस, पुष्कर श्रोत्री, सुशांत शेलार, संजय जाधव, रवी जाधव, राहुल रानडे, सिद्धार्थ जाधव, उषा जाधव, सई ताम्हणकर, ऋजुता देशमुख, मन्वा नाईक, क्रांती रेडकर आदी सर्व कलाकार या वेळी उपस्थित होते. चंद्रकांत कुलकर्णी यांनी कलावंतांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. ‘एक चांगला दिग्दर्शक त्याच्या कारकिर्दीच्या टोकावर असताना असा अचानक निघून जावा, ही फारच धक्कादायक घटना आहे. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला या बातमीने धक्का बसलाय. या प्रसंगी आम्ही सगळ्यांनी तेथे असायला हवे होते. पण सगळेच कलावंत मकाऊमध्ये असल्यामुळे आता ते शक्य नाही’, असे कुलकर्णी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 2:35 am

Web Title: dedicated to cinemas
Next Stories
1 राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन
2 ‘कॅम्पा कोला’तील रहिवाशांना चार आठवड्यांची अखेरची मुदत
3 आता संक्रमण शिबिरे नाहीत
Just Now!
X