|| रसिका मुळये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ५०० जागा रिक्त

वैद्यकीय अभ्यासक्रम महागल्यामुळे गुणवत्ता असूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. दुसरीकडे नामांकित अभिमत विद्यापीठांवरही गुणवत्ता आणि शुल्ककपातीच्या बाबतीत तडजोड करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केल्याचे कारण पुढे करून काही विद्यापीठांनी शुल्ककपात केली असली तरी त्यांच्याकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांची राज्यातील संख्या यंदा सुमारे ७० हजार असतानाही अभिमत विद्यापीठांमधील जागा दुसऱ्या फेरीनंतरही रिक्त आहेत. यंदा राज्यात जवळपास ७० हजार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले. शासकीय, खासगी, दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता साधारण आठ ते दहा हजार, तर अभिमत विद्यापीठांची प्रवेश क्षमता एक हजार ८०० आहे. यंदा अभिमत विद्यापीठांनी त्यांच्या शुल्कात जवळपास ८० टक्के वाढ केली आहे.

प्रतीवर्षी किमान १४ लाख ते कमाल २६ लाख रुपये या घरात अभिमत विद्यापीठांचे शुल्क आहे. त्यानुसार चार वर्षांचे शुल्क अधिक वसतिगृहाचा खर्च यांची बेरीज केली तर अभिमत विद्यापीठातून डॉक्टरकीची पदवी मिळवण्यासाठी किमान ६० लाख ते दीड कोटी रुपये मोजावे लागतात. पात्रता आणि इच्छा असतानाही केवळ आवाक्याबाहेरच्या शुल्कामुळे विद्यार्थ्यांनी अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवली आहे.

केंद्रीय वैद्यकीय संचालनालयाने घेतलेल्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीनंतरही अभिमत विद्यापीठांमधील जागा रिक्त आहेत. अनेक नामवंत विद्यापीठांमध्ये दोन फेऱ्यांनतरही सुमारे २५ टक्के जागा रिक्त आहेत. एकूण प्रवेश क्षमतेपैकी दुसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जवळपास ५०० जागा रिक्त आहेत.

शुल्क कपातीची वेळ

शुल्क भरू शकतील अशा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी काही अभिमत विद्यापीठांनी दलालांची नेमणूक केल्याचे तर काहींनी शुल्क कमी केल्याचे सांगण्यात येते. गुणवत्ता बासनात बांधून शुल्क भरण्याची क्षमता या पात्रतेवर काठावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात येत असल्याचे समजते. सर्वाधिक शुल्क असलेल्या पुण्यातील एका अभिमत विद्यापीठाने शुल्क कमी केले आहे. या विद्यापीठाचे शुल्क प्रतिवर्षी २६ लाख रुपये होते. शिवाय पात्रता शुल्क तीन लाख ९० हजार रुपये, तर वसतीगृहाचे शुल्क दोन लाख पाच हजार ५०० रुपये असे होते. महाविद्यालयाने शुल्क चार लाख रुपयांनी कमी केले. याशिवाय पात्रता शुल्कही ६० हजारांनी कमी करण्याची विनंती प्रवेश समितीकडे केली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सुबत्ताधारक विद्यार्थ्यांच्या शोधात असणारी आणखी दोन विद्यापीठे शुल्क कमी करणार असल्याची चर्चा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deemed university
First published on: 19-08-2018 at 02:05 IST