बिगरकाँग्रेसी, हिंदुत्ववादी राजकारणावर शिक्कामोर्तब? सत्ताधारी भाजपची खेळी

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय व नानासाहेब देशमुख यांच्या कार्याच्या गौरवाचा प्रस्ताव मांडून सत्ताधारी भाजपने सर्वपक्षीय साक्षीने त्यांच्या हिंदुत्ववादी व बिगरकाँग्रेसी राजकरणावर शिक्कामोर्तब करून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मांडलेल्या गौरव प्रस्तावाला काँग्रेस नेते नारायण राणे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या उल्लेखनीय संसदीय कार्याचा गौरव करण्याच्या प्रस्तावावर या अधिवेशनात चर्चा करण्याचे ठरले होते.

त्यानुसार आधी शरद पवार यांच्या कार्याचा प्रस्ताव मांडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. काल गुरुवारी इंदिरा गांधी यांच्या कार्याचा गौरव करणारा मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधी यांच्या कणखर व खंबीर नेतृत्वाचा गौरव करताना, त्यांनी लादलेल्या आणीबाणीबद्दल विरोधी विचार मांडले. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती.

मुख्यमंत्र्यांनी आज दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख व बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मांडला. दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व जनसंघाचे संस्थापक होते. त्यांनी एकात्म मानवतावादाचा विचार मांडल्याचे त्यांनी सांगितले.

‘विरोधकांची मोट बांधली’

सत्तरच्या दशकानंतर काँग्रेसच्या विरोधात विशेषत इंदिरा गांधींच्या विरोधात समाजवादी विचारांच्या पक्षांसह अन्य पक्षांना, नेत्यांना एकत्र आणण्यात नानाजी देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्याचबरोबर त्यांनी चरणसिंग यांना हाताशी धरून उत्तर प्रदेशात बिगरकाँग्रेसी सरकार आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. एका बाजूला इंदिरा गांधी यांच्या कार्याचा गौरव आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधींच्या किंवा काँग्रेसच्या विरोधात राजकारणाची मुहूर्तमेढ रोवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सत्ताधारी भाजपने काँग्रेसची पंचाईत केली.

देशात सत्ता परिवर्तनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची हाक दिली. त्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून व जनसंघ या राजकीय पक्षाच्या स्थापनेच्या माध्यमातून बीज पेरणी केली, त्यांच्या कार्याबद्दल, विचारांबद्दल आदर व्यक्त करण्याचा प्रस्ताव मांडून भाजपने एक प्रकारे बिगरकाँग्रेसी, हिंदुत्ववादी राजकारणावर सर्वपक्षीय साक्षीने शिक्कमोर्तब करून घेतल्याचे मानले जात आहे.