सात वर्षांपूर्वी बंद पडलेला मुंबईतील कुप्रसिद्ध दीपा बार सध्या पुन्हा चर्चेत आहे. या बारचा मालक सुधाकर शेट्टी याने ‘जय महाराष्ट्र’ ही मराठी वृत्तवाहिनी सुरू केली आहे. या वाहिनीच्या उद्घाटनानिमित्त आयोजित पार्टीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये शनिवारी ही पार्टी देण्यात आली. क्रिकेटमधील सट्टेबाजीच्या प्रकरणामुळे २००५ मध्ये दीपा बार गाजला होता. यानंतर लगेचच म्हणजे २००६ मध्ये हा बार बंद झाला. विलेपाल्र्यातील हा एकेकाळचा चर्चेचा विषय असलेला हा डान्स बार म्हणजे राजकारणी, नोकरशहा, उद्योगपती, चित्रपट व्यावसायिक आणि क्रिकेट बुकींचे भेटीगाठी घेण्याचे मोक्याचे ठिकाण होते. तरुन्नम खान ही नर्तिका या बारचे खास आकर्षण होती.
रिअल इस्टेट क्षेत्रातील सहाना समूह या कंपनीचा शेट्टी हा मालक आहे. राजकीय वरदहस्ताचा लाभ उठविण्यासाठी अनेक बिल्डर आणि चिटफंड व्यावसायिकांनी माध्यमांच्या क्षेत्रात याआधीच प्रवेश केला आहे. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. मराठी वृत्तवाहिनीनंतर हिंदी वृत्तवाहिनी सुरु करण्याचा शेट्टी याचा विचार असल्याचे समजते. ‘शेट्टी हा अजूनही हॉटेल व्यवसायात आहेत. त्याने काही चित्रपटांनाही अर्थसहाय्य केले आहे,’ अस एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तो म्हणाला, “दर्शन समूहाने केलेल्या कथित करचुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर खात्याने सप्टेंबर २०११ मध्ये शेट्टी याच्या अंधेरीतील कार्यालयावर छापा घातला होता. राजकारणी आणि चित्रपट अभिनेत्यांशी  शेट्टीने धोरणीपणाने घनिष्ठ संबंध ठेवले होते. त्याने शनिवारी दिलेल्या पार्टीला सत्ताधारी नेत्यांबरोबरच भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे याचबरोबर उद्योगमंत्री नारायण राणे, सार्वनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तसेच प्रियांका चोप्रा, सुनील शेट्टी धर्मेद्र, श्रीदेवी, ओम पुरी, जावेद अख्तर आणि बोनी कपूर अशा तारे तारकांची उपस्थिीती होती.