दीपक केसरकर यांचा आरोप; पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली

भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर राज्यभरात परिस्थिती बिघडण्यास समाज माध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवा कारणीभूत आहेत, असा आरोप करत मुंबईसह राज्यभर पोलिसांनी अतिशय कुशलतेने व संयमाने परिस्थिती हाताळल्यानेच महाराष्ट्र बंदच्या काळात काही ठिकाणी दगडफेक, रेल-रस्तारोको वगळता कुठलीही अनुचित घटना घडली नाही. अपवाद वगळता बंद शांततेत पार पाडण्यात पोलिसांना यश आल्याचा दावा, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला सोशलमिडियाच जबाबदार आहे. वढू बुद्रूक येथे आपण स्वत भेट देऊन माहिती घेतली. त्या गावात पूर्णपणे शांततेचे वातावरण होते. पन्नास जणांना जरी ताब्यात घेण्यात आले असले तरी केवळ नऊ जणांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. तिथे बाहेरून आलेल्या लोकांनी बॅनर्स लावले. त्याच्या विपर्यस्त बातम्या सोशलमाध्यमांद्वारे पसरविण्यात आल्या. चुकीच्या आणि खोट्या क्लिप व्हायरल करण्यात आल्यानेच परिस्थिती चिघळली. मृत तरुण हा दलित समाजाचा असल्याचे पसरविण्यात आले. मात्र तो तरुण दलित समाजाचा नाही. कोणत्याही समाजातला असला तरी ती घटना दुर्दैवी आहे. या हत्येप्रकरणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

बंदच्या काळात पोलिसांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली. औरंगाबाद शहरात एका ठिकाणी दीड हजाराचा जमाव हिंसक होत असल्याने त्यांना पांगविण्यासाठी प्लॅस्टिक बुलेटचा वापर करण्यात आला. पोलिसी बळाचा राज्यभरात केवळ या एकाच ठिकाणी वापर झाला. अन्यथा राज्यात कुठेही पोलिसी बळाचा वापर करण्यात आला नाही. चंद्रपूर येथे एका आमदाराच्या कार्यालयावर हल्ला करून खुच्र्याची मोडतोड करण्यात आली. नांदेड येथे पोलीस वाहनांवर दगडफेक झाली. मुंबईतील घाटकोपर, रमाबाईनगर, पंतनगर, दादर, भोईवाडा येथे मोठया प्रमाणात जमाव जमला होता. जमावाने रेल व रास्तारोको केला. मात्र हा जमाव उत्स्फूर्त होता कोणीही त्याचे नेतृत्व केले नाही. काही तुरळक प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला, अशी माहिती केसरकर यांनी दिली.  महाराष्ट्राने देशाला सामाजिक परिवर्तनाची चळवळ दिली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा आज देशभरात जपण्यात येत आहे.  जनतेने सामाजिक सलोखा राखण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांनीही समाजात एकी कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार नाहीत

या काळात अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले असले तरी निर्दोष व्यक्तींवर गुन्हा दाखल होणार नसल्याची ग्वाही देखील केसरकर यांनी दिली. भीमाकोरेगाव येथे जी दुकानांची तोडफोड व वाहनांची जाळपोळ झाली त्याची नुकसानभरपाई राज्य सरकार देणार असल्याचेही केसरकर यांनी जाहीर केले.