07 July 2020

News Flash

पळता पळता हरीण थेट छतावरून घरात

मुंबईतील पवई परिसरातील घटना

मुंबईतील पवई परिसरातील घटना

मुंबई : बिबटय़ापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जिवाच्या आकांताने पळत असलेले एक हरिण पळता पळता एका घराचे छत फोडून आत कोसळल्याची घटना शनिवारी रात्री मुंबईतील पवई भागात घडली. पवईतील हनुमान टेकडी परिसरातील या घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना घरावरील सिमेंटचा पत्रा फोडून आत कोसळलेले हे हरिण इतके भांबावले होते की नंतर बराच वेळ ते या घरातील एका कोपऱ्यात निश्चलपणे बसले होते.

हनुमान टेकडीचा हा परिसर राष्ट्रीय उद्यानालगतच असून येथे वन्यप्राणी दिसणे दुर्मीळ नाही. मात्र, शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेने साऱ्यांनाच चकीत केले. बिबटय़ापासून स्वत:चा जीव वाचवून पळत असताना हे हरिण घरात कोसळले असावे, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या हरिणाला ताब्यात घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

घराच्या छतावरील सिमेंटचा पत्रा हरणाचा भार सहन न झाल्याने मोठा आवाज करत कोसळला. त्यामुळे या घरातील व आसपासच्या घरांतील मंडळी जागी झाली. तेव्हा कोपऱ्यात बसलेल्या हरणाला पाहून सारेच अवाक झाले. या छोटय़ाशा खोलीतील स्वयंपाकाच्या शेगडीशेजारीच असलेल्या कपाटाला लागून बसलेल्या या हरिणाची चित्रफित रविवारी चर्चेचा विषय ठरली.

२०० चिमण्यांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्हय़ात रविवारी सकाळी सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चिमूर तालुक्यातील नेरी येथे २०० चिमण्यांचा मृत्यू झाला. घराजवळील झाडांवर वास्तव्यास असलेल्या या चिमण्या सकाळी मृतावस्थेत आढळल्याचे स्थानिकांनी सांगितले.

काळविटाचा हकनाक बळी

नागपूर : जंगलातून वाट चुकलेल्या आणि शहरात प्रवेश केलेल्या काळविटाला जंगलाची वाट दाखवण्याऐवजी चित्रिकरणासाठी वाहनावरून त्याचा पिच्छा केल्याने काळविटावर जीव गमावण्याची वेळ आली. गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरात ही घटना घडली. रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास गणेशनगर परिसरात एक काळवीट शिरले. त्याची माहिती वनखात्याच्या देण्याऐवजी एका युवकाने वाहनावरून त्याचा पिच्छा पुरवला. परिणामी ते काळवीट एका ठिकाणी धडकून मेले. वनखात्याला माहिती मिळताच त्यांनी काळवीट ताब्यात घेतले. सेवा संस्थेच्या साहाय्याने त्या युवकाचा शोध सुरू असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 2:23 am

Web Title: deer directly enter into the house from roof in the powai area of mumbai zws 70
Next Stories
1 शिकवलेल्या अभ्यासक्रमावरच अंतिम वर्षांची परीक्षा
2 राज्यातील कारखान्यांत १२ तासांच्या दोन पाळ्या
3 परदेशी उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कृतीदल
Just Now!
X