उमाकांत देशपांडे

२०१४च्या तुलनेत जवळपास पाच लाख मतदार कमी; केवळ दक्षिण मुंबईत वाढ

राज्यातील मतदारांची संख्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत ६५,३१,६६१ ने वाढली असली तरी मुंबईत मात्र पाच लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या ४,८५,७०० ने घटली आहे. केवळ दक्षिण मुंबईतील मतदारांच्या संख्येत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४६,०९० ने वाढ झाली आहे.

राज्यातील सर्वात मोठा (ठाणे) आणि सर्वात लहान (दक्षिण मुंबई) मतदारसंघ मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातच आहे. मतदारांची संख्या घटल्याने काही मतदारसंघांत भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांतील चुरस वाढणार आहे आणि त्याचा परिणाम निकालावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवीन मतदारांची संख्या वाढूनही आणि मतदार नोंदणी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केल्यानंतरही मुंबईत मतदारसंख्या घटली आहे. मात्र याआधी मतदार याद्यांमध्ये दुबार नावे होती. निधन झालेल्या किंवा ठाणे जिल्ह्य़ात राहावयास गेलेल्या मतदारांचा समावेश होता, त्यामुळे त्या याद्या सदोष होत्या. मुंबईतील रहिवासी मोठय़ा प्रमाणावर ठाणे जिल्ह्य़ात स्थलांतरित झाले आहेत. या मतदारांची नावे मुंबईतील याद्यांमधून काढून टाकल्याने मतदारसंख्या घटली असल्याचे आयोगातील उच्चपदस्थांनी सांगितले.

मुंबईतील मतदार याद्या सदोष असल्याची तक्रार काँग्रेसने आयोगाकडे केली आहे. ज्यांची नावे यादीत नाहीत, त्यांना ती नोंदवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी १० दिवसांपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरच एकूण मतदारांची संख्या अंतिम होणार आहे. यादीची पडताळणी करून आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री सर्वानी करून घ्यावी, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ठाणे हा राज्यात सर्वात मोठा मतदारसंघ ठरला असून तेथे २३,०७,२३२ मतदार आहेत, तर दक्षिण मुंबई या सर्वात लहान मतदारसंघात १५,३१,४४६ मतदार आहेत. मावळ हा मतदारसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ असून तेथे २२,२७,१३३ मतदार आहेत, अशी माहिती आयोगातील उच्चपदस्थांनी दिली.

मुंबईतील मतदारसंख्या

मतदारसंघ      २०१९         २०१४        घट किंवा वाढ

उत्तर मुंबई     १६०७२६५       १७८३६४१       १७६३७६

उत्तर पश्चिम  १६९७६६८       १७७५१८७       ७७५१९

उत्तर पूर्व      १५५८७७४       १६६७९८१       १०९२०७

उत्तर मध्य     १६४७६३९       १७३८३४७        ९०७०८

दक्षिण मध्य    १४१५६०५       १४४७४९५       ३१८९०

दक्षिण         १५३१४४६             १४८५३५६        ४६०९०