26 September 2020

News Flash

मुंबईला नवे पोलीस आयुक्त मिळण्यास विलंब?

राज्याच्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक डॉ. श्रीदेवी गोयल या ३१ मार्चला सेवानिवृत्त होत असल्या तरी हे पद तातडीने भरावयाची गरज नसल्यामुळे मुंबईचे विद्यमान आयुक्त डॉ. सत्यपाल

| March 31, 2013 03:04 am

राज्याच्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक डॉ. श्रीदेवी गोयल या ३१ मार्चला सेवानिवृत्त होत असल्या तरी हे पद तातडीने भरावयाची गरज नसल्यामुळे मुंबईचे विद्यमान आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांना बढती दिली जाण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे डॉ. सिंग यांच्यासह अहमद जावेद, के. पी. रघुवंशी यांना समितीने महासंचालकपदी बढती देण्यास हिरवा कंदील दाखविल्यामुळे मुंबईला नवा पोलीस आयुक्त मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे.                                                                                  
राज्याचे विद्यमान महासंचालक संजीव दयाळ हे सप्टेंबर २०१५ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर महासंचालकांच्या रांगेत असलेले प्रवीण दीक्षित (जुलै २०१६), अरूप पटनाईक (सप्टेंबर २०१५), डॉ. सत्यपाल सिंग (जून २०१५) यांना राज्याचे प्रमुख पद मिळण्याची सध्या तरी शक्यता नाही. त्यामुळे तूर्तास दीक्षित यांच्यासह डॉ. सिंग हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यास इच्छुक आहेत. डॉ. सिंग यांनी अद्याप तसा अर्जही केलेला नाही. त्यातच बढती समितीने डॉ. सिंग यांच्यासह राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक अहमद जावेद, ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्या महासंचालकपदाच्या बढतीला हिरवा कंदील दिला आहे. डॉ. गोयल यांच्या निवृत्तीमुळे महासंचालकांचे एक पद रिक्त झाले आहे. डॉ. सिंग यांना या पदी जाण्यात रस नाही. दीक्षित यांचेही केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या महासंचालकांच्या दोन पदांमुळे जावेद आणि रघुवंशी यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. सेवाज्येष्ठतेमुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी कांबळे यांचे नाव घेतले जात आहे. मात्र कांबळे यांची आता नियुक्ती झाल्यास त्यांनाही मग सहा महिन्यांचाच कालावधी मिळू शकतो. याचे कारण म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी हे सप्टेंबरअखेरीस निवृत्त होत आहेत.
निर्णय लवकरच
विद्यमान पोलीस आयुक्त डॉ. सिंग यांना बढती दिल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. मुख्य सचिवांच्या समितीकडून आयुक्तपदासाठी तीन नावे सुचविली जातात. त्यातून सेवाज्येष्ठता तसेच इतर मुद्दय़ांवरून एकाची नियुक्ती केली जाते. ही नावे अद्याप शासनाकडे आलेली नाहीत, असेही पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 3:04 am

Web Title: delay in selection of new police commissioner for mumbai
Next Stories
1 वर्सोवा ‘धुळवड’ प्रकरणी अद्याप कारवाई नाही
2 कोल्हापूर, सांगली, नाशिक जिल्हा बँका अडचणीत
3 सीसीटीव्ही फूटेज नीट नसले तरी पोलिसांनी अन्य पुरावे जमा करावेत
Just Now!
X