मुंबई : वादळ आणि गडगडाटी ढगांचा वेध घेणाऱ्या ‘सी’ रडारचे मुंबईतील आगमन लांबले आहे. हे रडार यंदाच्या जूनमध्ये कार्यरत करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, टाळेबंदीत प्रवासातील अडचणी, मनुष्यबळ अनुपलब्धता यामुळे या रडारचे आगमन किमान दोन महिने लांबण्याची शक्यता असून, यंदाच्या पावसाळ्यात या रडारचा लाभ मुंबईकरांना कितपत मिळेल याबाबत संदिग्धता आहे.

हवामानातील बदल, चक्रीवादळ, गडगडाटी पावसाची शक्यता वर्तविण्यासाठी हवामान विभागाकडून इतर प्रणालींबरोबरच रडारचा वापर केला जातो. सध्या मुंबईत ‘एस’ बॅण्ड रडार कार्यरत असून त्याद्वारे चक्रीवादळाचा वेध घेता येतो. याद्वारे ५०० किमीपर्यंतच्या टप्प्यातील बदल टिपले जातात. तर ‘एक्स’ बॅण्ड रडार हे हवामानातील तीव्र बदल टिपते. ‘सी’ बॅण्ड रडारमध्ये हवामानातील तीव्र बदल, गडगडाटी ढगांसह चक्रीवादळाचादेखील वेध घेण्याची क्षमता असते. त्याद्वारे २५० ते ३०० किमी टप्प्यातील बदल टिपता येतात.

मुंबईसह महानगर प्रदेशासाठी चार ‘एक्स’ बॅण्ड रडार आणि एक ‘सी’ बॅण्ड रडार बसविण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला. त्यानुसार या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी एक ‘सी’ बॅण्ड रडार कार्यरत करण्यात येणार होते. उपनगरात वेरावली, गोरेगाव येथील एका छोटय़ा टेकडीवर हे रडार बसविण्यासाठी महापालिकेने जागाही उपलब्ध करून दिली आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता वगैरे स्थापत्याची कामे करावी लागणार आहेत. ही सर्वच कामे टाळेबंदीमुळे रखडली असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘सी’ बॅण्ड रडार हे बंगळूरु येथून आणण्यात येणार आहे. त्यापूर्वी वेरावली येथील बांधकाम आणि या सर्व चाचण्यांसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याचे हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.