रेल्वेच्या रियल टाइम लोकेशनला तांत्रिक कारणांमुळे विलंब; सेवेत येण्यापूर्वीच तांत्रिक अडचणींचा सामना

लोकल किती मिनिटांत येणार याची अचूक माहिती देणारी यंत्रणा (रिअल टाइम लोकेशन) १५ ऑगस्टला प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा रेल्वेचा मुहूर्त हुकला आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा विलंबाने येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या सुविधेची प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

रेल्वे स्थानकातील इंडिकेटरवर लोकल किती वेळात येत आहे, याची माहिती प्रवाशांना मिळत असते. मात्र काही वेळा इंडिकेटरवर दाखवणाऱ्या माहितीप्रमाणे लोकल वेळेत येतेच असे नाही. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यात सुधारणा करण्याबरोबरच प्रवाशांना लोकलची सद्य:स्थिती दर्शविणारी सुविधा आणण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. लोकल गाडय़ांत जीपीएस यंत्रणा बसवून प्रवाशांना मोबाइलवर अचूक माहिती देण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्याप्रमाणे मध्य रेल्वे मोबाइल अ‍ॅपही विकसित करत आहे. त्यामुळे लोकल उशिराने धावत असल्यास त्याची माहिती मिळेल आणि प्रवाशांना वेळेचे नियोजन करता येईल. यात अन्य सुविधांचाही असेल.

ही सुविधा १५ ऑगस्टपासून मध्य रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आणली जाणार होती, परंतु त्याला आणखी विलंब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. अ‍ॅप आणि जीपीएसमधील तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी थोडा कालावधी लागेल. त्यानंतरच ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत येईल. जीपीएसमुळे प्रवाशांना मोबाइलवर मनोरंजन कार्यक्रमही पाहता येणे शक्य होणार आहे. ‘मोबाइल अ‍ॅप व जीपीएसमधील तांत्रिक अडथळे दूर केले जात आहेत. लवकरच सुविधा प्रवाशांच्या सेवेत येईल,’ असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. जैन यांनी सांगितले.