दिल्ली आणि परिसरातील आयफोन चोरून ते ‘राजधानी एक्स्प्रेस’ने मुंबईत आणून विकणाऱ्यांची टोळी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यात राजधानी एक्सप्रेसच्या एका मदतनीसाचाही समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५ लाख रुपये किंमतीचे ३७ आयफोन जप्त केले आहेत.
‘राजधानी’मधून चोरीचे मोबाइल मुंबईत आणले जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सापळा लावून पिंटू प्रभाकर सरकार (२५) या ‘राजधानी’मधील मदतनीसाला अटक केली होती. दिल्लीत चोरलेले मोबाइल एका पार्सलमधून तो मुंबईत घेऊन येत होता.  हे पार्सल तो वसीम शेख या इसमाला देत असे. हे मोबाइल मग वसीम मुंबईतल्या हिरा पन्ना शॉपिंग सेंटरमधील दुकानदारांकडे विकत असे. हे दुकानदार मोबाइलमध्ये काही बिघाड करून ते कंपनीला पाठवून दुरुस्त करवून घेत असत. त्यामुळे मोबाइलचा जुना आयएमईआय क्रमांक जाऊन नवीन क्रमांक मिळत असे.
दिल्लीकर वसीम शेख उतरलेल्या गेस्ट हाऊसवर छापा घालून २७ आयफोन जप्त करण्यात आल्याची  माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली.