दिल्लीतील बलात्काराच्या ‘त्या’ नृशंस घटनेला बुधवारी बरोबर एक महिना झाला. महिनाभरात काय बदलले, की काहीच बदलले नाही, याचा हा आढावा..
नराधमांवर खटला सुरू
दिल्लीत १६ डिसेंबरच्या रात्री ‘त्या’ तरुणीवर पाशवी बलात्कार करणाऱ्या सर्वाना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर इनकॅमेरा खटला चालवण्यात येत आहे. आरोपींपैकी दोघांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्याला सर्वच स्तरातून विरोध झाला आहे. या नराधमांना थेट फाशीच द्यावी अशी मागणी होत आहे. मात्र, प्रचलित कायद्यांत त्यासाठी बदल करावा लागणार आहे.
मेणबत्ती मोर्चेही सुरूच
दिल्लीत झालेल्या प्रकारानंतर राजधानीसह देशाच्या कानाकोपऱ्यात मेणबत्ती मोर्चे निघाले. मूक निदर्शने झाली. पीडितेला न्याय मिळावा यासाठी अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या मोच्र्याचे आयोजन करण्यात आले. अनेक स्वयंसेवी संस्थांनी याचिका दाखल केल्या आहेत. अशा प्रकारचे गुन्हे होणारच नाहीत यासाठी बलात्काऱ्यांचे शिश्न कापावे इथपासून ते त्यांना षंढत्व निर्माण होईल अशा प्रकारची इंजेक्शने टोचावी (औषधे द्यावीत) इथपर्यंत अशा विविध प्रकारच्या शिक्षांची मागणी पुढे रेटण्यात येत आहे. राष्ट्रीय महिला आयोगही त्याला अपवाद नाही.
जाणीवजागृती जोमाने
या घटनेनंतर देशभरात एकंदरच बलात्कारासारख्या गुन्ह्य़ाच्या विरोधात महिलांमध्ये जाणीवजागृती मोहीम सुरू झाली आहे. अनेक राज्यांनी महिलांसाठी विशेष सुरक्षा योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात विशेषत मुंबईतील महिलांना शिवसेना २१ हजार चाकू वाटणार आहे!
मुक्ताफळांनाही बहर
‘त्या’ तरुणीने बलात्कार करणाऱ्यांना बंधुत्वाची आठवण करून दिली असती किंवा तिने देवाची आळवणी केली असती तर तिच्यावर हा प्रसंग गुदरला नसता अशा प्रकारची मुक्ताफळेही या महिनाभराच्या कालावधीत उधळली गेली. स्वतला आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्यांनी ही मुक्ताफळे उधळल्यानंतर  संस्कृतीरक्षक म्हणून ज्या राजकीय पक्षांचा उल्लेख करण्यात येतो त्या भाजप व तत्सम परिवारातील नेत्यांनीही अशाच प्रकारची ‘बौद्धिके’ जाहीर केली. महिलांनीच लक्ष्मणरेषेचा आदर करावा असा सल्ला कोणी दिला तर कोणी इंडियात बलात्कार होतात भारतात नाही अशी शेखी मिरवली! दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही पोलिसांची बाजू घेत आगीत तेल ओतले.