मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातन संस्थेशी संबंधित अतिरेकी कारवाया करणाऱ्यांचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला जाणीवपूर्वक तपास धीम्या गतीने करण्याचा आदेश दिला आहे. इंडिया स्कूप डॉट कॉम या वेबसाईटने यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले असून यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया स्कूप डॉट कॉम या वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक कर्नाटक एसआयटीला सहकार्य करत नसल्याचं वृत्त दिलं आहे. हे सत्य असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे असंही सचिन सावंत बोलले आहेत.

महाराष्ट्र सरकारची मुख्य सुत्रधारांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची इच्छा नसल्याचं यावरुन दिसत असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

नालासोपारा बॉम्बसाठा प्रकरणात संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली असतानाही दहशतवाद विरोधी पथकाने संभाजी भिडेंची साधी चौकशी करण्याची तसदी घेतलेली नाही. सनातन संसथेच्या साधकांना अटक करण्यात आली आहे. मात्र सनातनच्या जयंत आठवलेंचा साधा जबाबही पोलिसांनी घेतला नाही. त्यामुळे इंडिया स्कूप डॉट कॉम वेबसाईटचा रिपोर्ट सत्य असल्याची शक्यता अधिक दिसत असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delibrately investigation against sanatan is avoided
First published on: 19-09-2018 at 21:59 IST