युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून वस्तू मागल्याचे सांगत ‘मातोश्री’वरील कर्मचाऱ्यांना गंडा घालणाऱ्या १९ वर्षीय डिलेव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या ‘झोन ८’ ने केलेल्या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या तरुणाने नाव धीरेन मोरे असे असून तो आधी एका नामांकित कंपनीमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम करायचा.

परळमध्ये राहणारा धीरेन हा ग्राहकांच्या नावाने पार्सल तयार करुन त्यामध्ये कमी किंमतीच्या वस्तू ठेऊन त्याबदल्यात ग्राहकांकडून अधिक रक्कम घ्यायचा. याआधीही धीरेनला अशी फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. नुकतीच तुरुंगातून त्याची सुटका करण्यात आली होती. सामान्यांची फसवणूक करणाऱ्या धीरेनने चक्क आदित्य ठाकरे यांच्या नावाने खोटे पार्सल तयार करुन त्यामधून हलक्या दर्जाचे हेडफोन्स ‘मातोश्री’वर पोहचवले. धीरेन जेव्हा ‘मातोश्री’वर पार्सल देण्यासाठी गेला तेव्हा आदित्य घरी नसल्याने कर्मचाऱ्यांनी ते पार्सल घेतले. कर्मचाऱ्यांनी त्याला परस्पर पैसे दिले. अशाच प्रकारे धीरेनने एक-दोन वेळा नाही तर तब्बल तीन वेळा ‘मातोश्री’वरील कर्मचाऱ्यांना खोटे पार्सल देऊन त्यांना गंडा घातला. आदित्य यांच्या नावाने त्यांनी ऑर्डर न केलेल्या आणि हलक्या दर्जाच्या वस्तू महागड्या किंमतीच्या दाखवून धीरेनने ही फसवणूक केली.

असा झाला भांडाफोड

गुरुवारी (१२ सप्टेंबर रोजी) धीरेन आदित्य यांच्या नावाचे एक पार्सल घेऊन नेहमीप्रमाणे डिलेव्हरी देण्याच्या नावाने ‘मातोश्री’वर गेला. मात्र त्यावेळी आदित्य घरीच होते. तेथील कर्मचाऱ्यांनी आदित्य यांना पार्सलबद्दल माहिती दिली. मात्र ‘आपण कोणत्याही प्रकारची वस्तू ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून मागवलेली नाही,’ असं आदित्य यांनी सांगितले. आदित्य यांच्या या खुलाश्यामुळे धीरेनचा भांडाफोड झाला. त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले आणि खेतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

इतक्या रकमेचा गंडा घातला

‘झोन ८’चे पोलिस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार धीरेनने ‘मातोश्री’वरील कर्मचाऱ्यांना साडेआठ हजारांचा गंडा घातला आहे. हेडफोन्स, पुस्तक आणि कंप्युटर माईकसारख्या गोष्टी आदित्य यांनी मागवल्याचे सांगून कमी दर्जाच्या वस्तू बॉक्समधून देत धीरेन याने हा गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी धीरेनवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर ‘मातोश्री’च्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.