News Flash

लोकार्पणानंतरही कुल्र्याचे डिलक्स प्रसाधनगृह कुलूपबंद!

कुर्ला येथील अद्ययावत प्रसाधनगृह लोकार्पण कार्यक्रमापासूनच बंद अवस्थेत पडून आहे.

कंत्राटदाराची नेमणूक न करताच रेल्वेमंत्र्यांच्या रेटय़ामुळे उद्घाटन

गावात मंत्री येणार म्हणून झपाटय़ाने कामे केली जातात, शाळा वगैरे साफ केली जाते आणि मंत्री गेल्यानंतर अनेकदा दुसऱ्याच दिवशी शाळेला कुलूपही लागते.. द. मा. मिरासदारांच्या एखाद्या कथेत शोभावा असा प्रसंग मध्य रेल्वेवर घडला आहे. महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईतील अनेक प्रकल्पांचे लोकार्पण एका झटक्यात केले. त्यातील कुर्ला येथील अद्ययावत प्रसाधनगृह लोकार्पण कार्यक्रमापासूनच बंद अवस्थेत पडून आहे. विशेष म्हणजे रेल्वेमंत्र्यांनीच रेटा दिल्यानेच लोकार्पण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये भर पडावी, यासाठी त्यात या प्रसाधनगृहाची भरती करण्यात आली होती. पण हे प्रसाधनगृह चालवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झालेली नाही.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २२ ऑगस्ट रोजी दादर येथे झालेल्या एका कार्यक्रमात अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करत मुंबईकरांच्या सेवेत हे प्रकल्प खुले केले. त्यात कुर्ला येथील या अद्ययावत प्रसाधनगृहाचा समावेश करण्यात आला होता. हे प्रसाधनगृह बांधण्याचे कामही अत्यंत दिरंगाईने झाले होते. या प्रसाधनगृहाच्या कामाबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना वारंवार विचारले असता, १५ दिवसांत पूर्ण केले जाईल, असे नेहमी सांगितले जात होते. अखेर एका झटक्यात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्याच्या ओघात बांधून तयार असलेल्या या प्रसाधनगृहाचाही समावेश करण्यात आला. मात्र त्या दिवसापासूनच हे प्रसाधनगृह कुलूपबंद अवस्थेत पडून आहे. एवढेच नाही, तर उद्घाटनाच्या दिवशी सजावटीसाठी बांधलेल्या रिबिनीही तशाच दरवाज्याला बांधल्या आहेत.

याबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका अधिकाऱ्याला विचारले असता या प्रसाधनगृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठीचे कंत्राटच झाले नसल्याची माहिती गोपनीयतेच्या अटीवर त्याने दिली. एका रात्रीत असे कंत्राट देता येत नाही. त्यासाठी निविदा काढावी लागते. ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नसल्याने हे प्रसाधनगृह बंदच ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:57 am

Web Title: deluxe lavatory locked after inauguration in kurla
Next Stories
1 पोट‘पूजे’साठी यंदा ‘फ्रोझन’ मोदक
2 पालिकेच्या तिजोरीत ‘कचऱ्या’चा पैसा
3 पवई तलावातील प्रदूषणाबाबत लोकायुक्तांनी अहवाल मागवला
Just Now!
X