देवनार कचराभूमीमध्ये कचऱ्यात मिथेन वायू निर्माण होण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असून त्यामुळेच कचराभूमीत वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. ‘आयआयटी’ आणि ‘निरी’ या संस्थांनी मिथेन वायूबाबत अभ्यास करुन आपल्या अहवालात उपाययोजना सुचविली आहे. कचराभूमीत वारंवार लागणारी आग रोखण्यासाठी पालिकेने या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीकडून करण्यात आली आहे.
देवनार कचराभूमीत १९९७ पासून कचरा टाकण्यात येत असून आतापर्यंत तेथे १२.७ दशलक्ष टन घनकचरा साचला आहे. या कचऱ्यामध्ये मिथेन वायूची निर्मिती होत असल्यामुळे तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन कचऱ्यात निर्माण होणाऱ्या मिथेन वायू कमी करण्याबाबत ‘आयआयटी’ आणि ‘निरी’ या संस्थांनी संशोधन केले असून त्याबाबतचा अहवालही तयार केला आहे.
या अहवालातील उपाययोजनांचा अवलंब करुन देवनार कचराभूमीतील आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे पालिकेने गेल्या बुधवारपासून धुमसणाऱ्या कचराभूमीत या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.