मुंबई : करोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईकरांच्या मदतीसाठी जाहीर केलेल्या हेल्पलाइनवर धान्याच्या पुरवठय़ासाठी अनेक नागरिकांनी संपर्क साधला आहे. त्याखालोखाल अन्नपदार्थाची तयार पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने धान्य आणि अन्नपदार्थाच्या पाकिटांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात येत आहे.

टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद आहेत. मात्र किराणा मालाच्या दुकानांमधील काही जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. खासगी दवाखाने बंद आहेत. मुंबईकरांना आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी पालिकेने ३० मार्च रोजी १८००२२१२९२ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केला आहे. या हेल्पलाइनवर रविवार, ५ एप्रिलपर्यंत २६२५ जणांनी संपर्क साधला होता. यापैकी १४८४ जणांनी अन्नधान्याचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. त्याखालोखाल ९८९ जणांनी अन्नपदार्थाची पाकिटे मिळावी यासाठी पालिकेशी संपर्क साधला होता. अन्य ठिकाणी जाण्यासाठी सात जणांनी वाहतूक व्यवस्थेची, तर निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी सात जणांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधला आहे. या हेल्पलाइनवर शहर भाागातील ४२.२१ टक्के, पश्चिम उपनगरातील ३६.६९ टक्के, तर पूर्व उपनगरातील १६.९५ टक्के नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला होता. पालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या हद्दीतून सर्वाधिक म्हणजे ३९७ जणांनी मदतीसाठी या हेल्पलाइनवर संपर्क साधला होता. त्याखालोखाल जी-उत्तरमधील ३१८, एफ-उत्तरमधील २१९, एच-पूर्वमधील २१७, पी-दक्षिणमधील १६२ नागरिकांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधला आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने या सर्वांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम पालिका युद्धपातळीवर करीत आहे.

‘त्या’ कामगाराच्या जीवाचे काय?

धारावी येथील करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू हा लोकमान्य टिळक रुग्णालयातील पहिलाच मृत्यू. मृतदेह बांधण्यासाठी कोणीही तयार नसताना रोजंदारीवरील कामगाराला हे काम करावे लागले. मात्र त्याला करोनासाठीचे पीपीई न देता एचआयव्हीचे पीपीई देण्यात आले. त्यानंतरही त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांची काळजी घेतली गेली. मात्र त्याच्या आरोग्याची कोणीही विचारपूसही केली नाही, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून समजले.

सध्या रुग्णालयाकडे पिशव्या उपलब्ध नसून मागणी केलेली आहे. बाजारातच तुटवडा असल्याने पिशव्या उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत.

– डॉ. मोहन जोशी, लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता