समाजमाध्यमावर बदनामी केली म्हणून ठाण्यातील एका अभियंत्याला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी पोलिसांनी बेदम मारहाण के ल्याच्या घटनेची तीव्र प्रतिक्रि या उमटली. आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने बुधवारी राज्यपालांकडे करण्यात आली. राष्ट्रवादीने मात्र यावर सावध प्रतिक्रि या व्यक्त केली.

करोनाच्या विरोधात लढण्यासाठी गेल्या रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे दिवे बंद करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के ले असता त्याला आव्हाड यांनी विरोध दर्शविला होता. यावरून समाजमाध्यमांमध्ये आव्हाड यांची खिल्ली उडविण्यात आली. ठाण्यातील अनंत करमुसे यांनीही समाजमाध्यमावर आव्हाड यांचे एक चित्र प्रसिद्ध केले. हे चित्र वाईट पद्धतीचे असल्याचा आव्हाड समर्थकांचा आक्षेप होता.

आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी आव्हाड यांच्याच निवासस्थानी व त्यांच्या समक्ष बेदम मारहाण केल्याची तक्रार करमुसे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रोर नोंदविली. आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या घटनेची राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. करमुसे यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी मुलुंडमधील त्यांच्या निवासस्थानीच रोखले. नंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सोमय्या व ठाणे भाजपचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे हे करमुसे यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले असता टोल नाक्यावर त्यांना रोखण्यात आले. आव्हाड यांना वाचविण्यासाठी सारी पोलीस यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप सोमय्या यांनी के ला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या वेळी एका सामान्य नागरिकाला मंत्र्यांच्या निवासस्थानी बेदम मारहाण होत असल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. आव्हाड यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ  करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.

‘सत्य बाहेर येईल’

ठाण्यातील एका नागरिकाने केलेल्या तक्रोरीवर सध्या पोलीस तपास सुरू आहे. चौकशीतच सारे सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रि या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमातून विकृत बदनामी करणे थांबविले गेले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.