मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १७ मार्चपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असून या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे आर. आर. पाटील फाऊं डेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

राज्यघटनेतील कलम १४५(३) नुसार या याचिका पाच सदस्यीय पीठाकडे वर्ग करण्याची विनंती पाटील यांनी न्यायालयास केली आहे.  आरक्षणाची टक्केवारी ५० हून अधिक ठेवता येणार नाही, असे घटनापीठाचे निर्बंध आहेत. याचिकांमध्ये राज्यघटनेतील कलम ३३८(ब), ३४२(अ),१५, १६  आदीं तरतुदींच्या संदर्भात मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे घटनापीठापुढेच सुनावणी व्हावी, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण न्यायालयात टिकविण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती काळजी घ्यावी व आम्हीही मराठा आरक्षणासाठी भक्कमपणे बाजू मांडू, असे विनोद पाटील यांनी सांगितले.