मंदीच्या सावटातही देशभरातील आयआयटीच्या कॅम्पस मुलाखतींची मात्र उत्साहात सुरुवात झाली आहे. मुलाखतींच्या पहिल्याच दिवशी आयआयटी मुंबईच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळाली असून, यंदा मुलाखतपूर्व संधींमध्येही वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी एक कोटी १७ लाख रुपये वार्षिक वेतनाची नोकरी मायक्रोसॉफ्टने देऊ केली आहे.

देशभरातील आयआयटीच्या कॅम्पस मुलाखतींची सुरुवात रविवारपासून झाली आहे. मंदीचे सावट आणि नोकऱ्यांचा तुडवडा अशी परिस्थिती दिसत असताना यंदा आयआयटीच्या कॅम्पस मुलाखतींची सुरुवात उत्साहात झाली. आयआयटी मुंबईमध्ये यंदा पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्ट, गुगल, गोल्डमॅन सॅश, उबर, ऑप्टिव्हर, क्वालकॉम यांसह १८ कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यंदा आयआयटी मुंबईतील १७००  विद्यार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतींसाठी अर्ज केले असून पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ११० विद्यार्थ्यांना नोकरीचे प्रस्ताव कंपन्यांनी दिले आहेत.

यंदा कॅम्पस मुलाखतींपूर्वी मिळणाऱ्या प्रस्तावांमध्येही यंदा जवळपास २४ टक्क्यांची वाढ झाली असून, १६० हून अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतींपूर्वीच नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. अभियांत्रिकीच्या मूलभूत शाखांबरोबरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसत आहे. आयआयटी मुंबईबरोबरच आयआयटी हैदराबाद, आयआयटी मद्रास, आयआयटी गुहावटी येथील कॅम्पस मुलाखती घेण्यासाठी कंपन्या सरसावल्या आहेत. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आयआयटी हैदराबाद येथील ५७, आयआयटी मद्रास येथील १०२, आयआयटी गुहावटी येथील ८० विद्यार्थ्यांना नोकऱ्यांचे प्रस्ताव आले आहेत.

पहिल्याच दिवशी कोटय़वधीचे प्रस्ताव

* पहिल्याच दिवशी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना कोटय़वधी रुपयांच्या वेतनाचे प्रस्ताव कंपन्यांनी दिले आहेत. परदेशी नोकरीसाठी मायक्रोसॉफ्टने साधारण एक कोटी १७ लाख रुपये वार्षिक वेतनाचा (१.६४ लाख अमेरिकन डॉलर्स) प्रस्ताव दिला आहे.

* ऑप्टिव्हर आणि उबरने १ कोटी २ लाख रुपयांचा वार्षिक वेतनाचा प्रस्ताव दिला आहे. भारतातील नोकरीसाठी क्वॉलकॉमने सर्वाधिक ३२.५९ लाख रुपये वार्षिक, तर त्या खालोखाल गुगलने ३२ लाख वार्षिक वेतनाचा प्रस्ताव दिला आहे.