मुंबई : बांधकाम उद्योगाला हळूहळू उभारी येऊ लागली असली तरी आलिशान घरांपेक्षा एक कोटी रुपयांहून कमी किमतीच्या घरांना चांगलीच मागणी असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या घरांच्या विक्रीचा विचार केला, तर ६० टक्के घरे ही एक कोटींपेक्षा कमी किमतीची असल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ या काळातील राज्याच्या मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील आकडेवारीनुसार, पाच कोटी वा त्यावरील किमतीच्या घरांची विक्री या काळात फक्त ३ टक्के झाली तर एक ते पाच कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री ३७ टक्के, तर एक कोटी वा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री ६० टक्क््यांच्या घरात झाल्याचे दिसून येते. एक कोटी रुपये किमतीपर्यंतच्या घरांची गेल्या वर्षभरात झालेली नोंदणी ४२ हजार ८००, तर एक ते पाच कोटी रुपयांच्या घरांची नोंदणी २९ हजार ५०० इतकी होती. पाच कोटी वा त्यावरील किमतीच्या फक्त ७५२ घरांची मुंबईत नोंदणी झाल्याचे ही आकडेवारी सांगते. नाइट फ्रँकने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे.

१ जानेवारीपासून मुद्रांक शुल्क एक टक्का वाढले तरी मुंबईत घरविक्रीच्या नोंदणीत घट झालेली नाही. १ जानेवारीपासून आतापर्यंत दहा हजारपेक्षा अधिक घरांची विक्री झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये घरांची विक्रमी नोंदणी झाली होती. याशिवाय डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क भरून पुढील चार महिन्यांत घरांची नोंदणी करण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली. त्यामुळे डिसेंबरात विक्रमी मुद्रांक शुल्क गोळा झाले असले तरी जानेवारी महिन्यातही घरांची विक्री नोंदणी थंडावलेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत जानेवारी २०२१ मधील घरविक्रीची नोंदणी लक्षणीय असल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे. किंबहुना गेल्या पाच महिन्यांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक नोंदणी एकट्या जानेवारी २०२१ मध्ये नोंदली गेली.

जानेवारीत १० हजार १७१ कोटींच्या घरांची विक्री

गेल्या २०२० मध्ये विकल्या गेलेल्या घरांची किंमत गृहित धरली तर ती एक लाख कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून येते. २०१९ मध्ये ती ९० हजार ७६९ कोटी होती. एकट्या जानेवारी २०२१ मध्ये दहा हजार १७१ कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाल्याचा दावाही या सूत्रांनी केला.