सक्करबाग प्राणिसंग्रहालयातील जोडी पुरवण्याची राष्ट्रीय उद्यानाची मागणी

बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’ने आपल्या सिंह सफारीकरिता पुन्हा एकदा गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला नव्या सिंहाच्या जोडीकरिता साकडे घातले आहे. सध्या सफारीत असणाऱ्या सिंहांमध्ये प्रजनन होणे अशक्य असल्याने राष्ट्रीय उद्यान प्रशासन नवीन सिंह आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुजरात सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यास पर्यटकांना धष्टपुष्ट, सोनेरी, तजेलदार कांतीच्या वनराज सिंहाला ‘याचि देही..’ पाहण्याची संधी मिळेल.

दीड वर्षांपूर्वी सिंहाची जोडी देण्याबाबत उद्यानाने प्रस्ताव पाठविला होता. तो सक्करबाग प्राणिसंग्रहालयाने फेटाळून लावला होता. दरम्यानच्या काळात कर्नाटकातून सिंहाची जोडी आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र तोही फोल ठरल्याने आता पुन्हा उद्यान प्रशासनाने सिंहांच्या जोडीकरिता गुजरात सरकारकडे मागणी केली आहे.

उद्यानातील  सिंह आणि व्याघ्र सफारीला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहता सफारीमध्ये नवीन सिंह आणि वाघ आणण्यासाठी प्रशासन बऱ्याच वर्षांपासून प्रयत्नशील  आहे. सफारीमधील बरेच प्राणी वयोवृद्घ झाले असून त्यांची प्रजननाची क्षमता संपुष्टात आली आहे, तर काही प्राणी एकाच आईची पिल्ले आहेत. पिंजराबंद अधिवासात त्यांच्यामध्ये प्रजनन घडवून आणणे नियमबाह्य़ आहे. सध्या उद्यानातील सफारीमध्ये तीन सिंहांचे वास्तव्य आहे. यामध्ये १५ वर्षीय रवींद्र आणि ७ वर्षीय जेस्पा नावाचा नर असून सात वर्षीय गोपा नावाची मादी आहे. रवींद्र हा वयोवृद्ध नर असल्याने त्याची प्रजनन क्षमता संपुष्टात आली आहे. तर गोपा आणि जेप्सा ही एकाच आईची पिल्ले असल्याने त्यांच्यामध्ये प्रजनन घडवून आणणे नियमबाह्य़ आहे. सिंह सफारी कायम ठेवण्याकरिता नवीन सिंहांची आवश्यकता असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानातील एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे पुन्हा एकदा गुजरातच्या जुनागढमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला सिंहाची जोडी देण्याबाबत प्रस्ताव पाठविल्याची माहिती त्या अधिकाऱ्याने दिली.