टाळेबंदीमुळे अर्धवट राहिलेल्या तसेच रखडलेल्या चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजच्या चित्रीकरणानंतरच्या कामांना परवानगी देण्याची मागणी वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने मुख्यमंत्र्यांना केली आहे.  चित्रपट-मालिकांच्या संकलन, डबिंग, कलर मिक्सिंग या कामांना परवानगी दिल्यास मनोरंजनविश्वाचे दोन महिन्यांत झालेले करोडो रुपयांचे नुकसान भरून काढण्यास हातभार लागेल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

नुकतेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना चित्रीकरणानंतरचे काम सुरू करण्याची परवानगी मागितली होती. या पाश्र्वभूमीवर एफडब्ल्यूआयसीईने मालिका, जाहिराती आणि वेब सिरीज यांची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. टाळेबंदीमुळे चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांचे संकलन, डबिंग, व्हीएफएक्स, डीआय, कलर मिक्सिंग ही कामे रखडली आहेत. या कामास कमी मनुष्यबळ लागते. राज्य शासनाने परवानगी दिल्यास सुरक्षेची काळजी घेऊन काम सुरू करण्यात येईल. स्टुडिओंचे निर्जंतुकीकरण करून  कर्मचाऱ्यांना मुखपट्टय़ा, हातमोजे देण्यात येतील, असेही संघटनेचे पदाधिकारी शशिकांत सिंग यांनी सांगितले.