घरगुती सजावटीकडे भक्तांचा कल; मखरविक्री दुकाने ओस

मुंबई : करोनाच्या भीतीमुळे आणि टाळेबंदीने आलेल्या मंदीमुळे सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाचे स्वरूप पालटून गेले आहे. गणेशोत्सवाला अवघे वीस दिवस राहिले आहेत. एव्हाना बाजारपेठा फुललेल्या असतात. विशेष म्हणजे सजावटीचे समान, मखरांना विशेष मागणी असते. परंतु यंदा ग्राहकांनी तयार मखरांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

घरगुती गणेशोत्सवासाठी दरवर्षी बाजारपेठेत नवेनवीन मखर येत असतात. थर्माकोल बंदीनंतरही अनेकांनी पर्यावरणपूरक मखरांचे आकर्षक प्रयोग केले. परंतु हे मखर खिशाला जड वाटू लागल्याने अजूनही व्यावसायिकांची दारे ओस पडली आहेत. लालबाग येथील कपडय़ांचे मखर घडवणारे श्री राम ड्रेसवाले उत्सव तोंडावर आलेला असतानाही ग्राहकांविना बसून आहेत. ‘एरव्ही या दिवसांमध्ये आम्हाला जेवायला वेळ मिळत नाही. पण आता दुकानांचे दार उघडून बसल्यानंतर काहीच काम नसते. या वर्षांसाठी काही नवीन नक्षीकाम केलेले मखरही शिवले आहेत. पण ग्राहकच नसल्याचे तेही पडून आहेत. बहुतांशी ग्राहक मुंबई बाहेरून येतो. लोकल बंद असल्याने तोही येऊ शकत नाही. शिवाय आमचा ८० टक्के  ग्राहक कोकणात जाणारा असल्याने करोनामुळे तोही कमी झाला,’ असे श्री राम ड्रेसचे हेमंत पटेल यांनी सांगितले. तर पर्यावरणपूरक मखर बनवणारे दादर येथील अरुण दरेकर यांनी यंदा मखरच बनवलेले नाहीत. पुठ्ठा, कापड, लाकडाचे तुकडे आणि चित्रांच्या सहाय्याने ते आकर्षक मखर घडवतात. परंतु मालाच्या उपलब्धतेअभावी त्यांनी मखर बनविता आलेले नाहीत. ज्यूटचा कपडा, पुठ्ठा आणि मखर घडवण्यासाठी लागणारे साहित्य बाजारात चढय़ा भावाने विकले जात आहे. त्यात कारागिरांची कमतरता आहे. करोनामुळे आधीच लोक आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी भाववाढ करून मखर विकणेही योग्य नाही. त्यामुळे यंदा केवळ कापडाचे,त्यातल्या त्यात स्वस्त असलेले मखर विकणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

बाजारात बनावट फुलांचे तयार मखरही मिळतात. दादर, लालबाग, महात्मा फुले मंडई बाहेरील परिसर अशा ठिकाणी हे मखर विक्रीला असतात. परंतु यंदा तीही फारशी दिसत नाहीत. ज्यांनी विक्रीला सुरवात केली त्यांच्याकडे ग्राहक नाहीत, अशी नाराजी संदीप पाटील या विक्रेत्याने व्यक्त केली. ‘वाहतूक सुरळीत नसल्याने फुलेही विक्रीस येत नाहीत. औपचारिक सोहळे थांबल्याने फु लांचा व्यवसायही बंद झाला आहे, ’ असे माटुंगा फुल बाजारातील कृष्णन नाडार यांनी सांगितले.

घरीच मखर बनवू

दुसरीकडे हातात बराच वेळ असल्याने भाविकांचा कलही घरीच मखर बनविण्याकडे आहे. ‘यंदा वर्क फ्रॉम होममुळे बराच वेळ हातात आहे. शिवाय हजारो रुपये वाया घालवून मखर आणण्यापेक्षा साडी, ओढणी आणि घरातील वस्तू वापरून सजावट करू,’ असे भांडूप येथील राहुल राणे यांनी सांगितले.