विविध कंपन्यांकडून गुंतवणुकीमुळे विणकरांच्या हाताला काम

खादीच्या कपडय़ांची मागणी बाजारात वाढली असल्याने खादीच्या विणकरांना चांगले दिवस आले आहे. अनेक कंपन्यांनी खादीमध्ये गुंतवणूक केल्याने या क्षेत्रातील निवडक विक्रेत्यांची एकाधिकारशाहीदेखील संपुष्टात आली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातील प्रमुख वस्त्र असलेल्या खादीची मागणी नंतरच्या काळात घटली होती. मागणी कमी झाल्यामुळे अनेक विणकरांच्या पोटावर पाय आला होता. मात्र बदलत्या काळात फॅशनचे तंत्र बदलल्याने खादीला मागणी वाढली. सध्या नव्या रचना असलेल्या साडय़ा, ड्रेस, वन पीस, गाऊ न, कुर्ते यांमुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना हे पोषाख आकर्षित करू लागले. खादी हा नफा देणारा उद्योग असल्याने मोठय़ा कंपन्यांनी काही प्रमाणात गुंतवणूक केली. २०१६ साली तंत्रज्ञानातील मायक्रोसॉफ्ट या कंपनीने खादीमध्ये गुंतवणूक केली. त्यानंतर २०१९ मध्ये री-विव्ह म्हणून ई-कॉमर्स संकेतस्थळाची स्थापना केली. यात त्यांनी कारागिरांना नवीन प्रकारच्या पोषाख रचनांची माहिती आणि डिजिटल प्रशिक्षण दिले. यातून स्थानिक विणकरांचा रोजगार २५ टक्क्यांनी वाढला, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रा सूद यांनी सांगितले. संपूर्ण जगात ९५ टक्के खादी आणि हातमागावरील वस्त्रे भारताकडून निर्यात होतात. भारतातील वस्त्रांना ग्राहकांकडून अधिक मागणी मिळत असते, असेही सूद म्हणाल्या.

सरकारने हरित खादीसारखा ब्रँड बाजारात आणून खादी उद्योग अनेक प्रकारे व्यावसायिकीकरण करण्यासाठी साहाय्य करत आहे. मनीष मल्होत्रा, संजुक्ता दत्ता, अनिता डोंगरे सारखे मोठे रचनाकार यात गुंतवणूक करून त्यांच्या मंचावर खादी आणि हातमागावरील वस्त्रांचे विपणन आणि विक्री करत आहेत. तसेच अनेक परदेशी वस्त्रोद्योजक, परदेशी वसलेले भारतीय आपल्या गावातील, राज्यातील विविध खादी विणकर समूहाला साहाय्य करत आहेत आणि व्यवसाय वाढवत आहेत. त्यामुळे खादीला चांगले दिवस आल्याचे अब्राहम यांनी सांगितले.

वर्षांला दोन हजार कोटींपर्यंत महसूल

सध्या या उद्योगातून वर्षांला साधारण २ हजार कोटींपर्यंतचा महसूल मिळत आहे. २०१८ मध्ये खादीच्या कपडय़ांची ५०० कोटींची निर्यात करण्यात आली होती, अशी माहिती ई-बिझिनेस सोल्यूशनच्या संधोशन विभागाचे संचालक विष्णू आर. रेड्डी यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांमध्ये भारतातील साधारण १० लाख विणकर तसेच इतर कारागिरांना या वाढत्या उद्योगामुळे रोजगार मिळाला आहे, असे रचनाकार रुकय्या अब्राहम यांनी सांगितले.