कोकण रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी करंजाडी स्थानकाजवळ मालगाडी घसरल्याचे निमित्त होऊन बहुतांश गणपती विशेष गाडय़ा रद्द करण्यात आल्या. या घटनेवरून धडा घेत किमान गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून या मार्गावरील मालगाडय़ांच्या वाहतुकीला कोकण रेल्वेने लाल कंदील दाखवायला हवा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. या मागणीला मुंबईच्या खासदारांनीही दुजोरा दिला असून रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे सोमवारी या मागणीचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने मालगाडय़ांची वाहतूक थांबवण्याची गरज नसून सर्व गाडय़ा नियोजनानुसार चालवण्यास कोकण रेल्वे सक्षम असल्याचे सांगितले.
मालगाडय़ांच्या वाहतुकीला गणेशोत्सवाच्या किमान दोन दिवस आधी कोकण रेल्वेमार्गावर बंदी करावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. गणेशोत्सव जवळ आल्यावर अशा प्रकारची घटना घडल्यास त्याचा फटका लाखो भाविकांना बसेल. मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी मालवाहतूक बंद ठेवली जाते. त्याच आधारे कोकण रेल्वेमार्गावर हा निर्णय घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी विचारला आहे.
मुंबईतील खासदार राहुल शेवाळे व अरविंद सावंत यांनीही या मागणीला दुजोरा दिला आहे. याबाबत आपण रेल्वेमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांशी बोललो आहोत. सोमवारी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडेही आपण ही मागणी करणार आहोत, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. तर ही मागणी रास्त असून त्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे अरविंद सावंत म्हणाले. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे एखादी गाडी घसरणे ही अतिशय अपवादात्मक परिस्थिती आहे. याआधीही गणेशोत्सवादरम्यान मालगाडय़ांची वाहतूक होत होती. आम्ही या गाडय़ांचे वेळापत्रक आखले असून कोकण रेल्वेमार्गावर नियोजनही केले आहे. त्यामुळे कोणताही अडसर येणार नाही, असे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.