उद्योगजगताची खेळी असल्याचे अभ्यासकांचे मत
प्रदूषण होत असल्याचे कारण पुढे करत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेतून कोळशाची वाहतूक करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी जोरात रेटली जात असली तरी यामागे उद्योगजगताची खेळी असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. या बंदराला पर्याय म्हणून देण्यात आलेली इतर दोन बंदरे ही बडय़ा उद्योगांच्या मालकीची असून नुकत्याच पार पडलेल्या कोळसा खाणीच्या लिलावातही संबंधित उद्योगांनी भाग घेतला होता.
मुंबई पोर्ट ट्रस्टची प्रचंड जागा हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. त्यातच गेले सहा महिने या भागात साठवलेल्या कोळशावरून चर्चा सुरू झाली आहे. कोळशाच्या राशींमुळे होत असलेल्या प्रदूषणाविरोधात एका बडय़ा वृत्तसमूहाने बातम्यांमार्फत मोहीमही केली. त्यानंतर २४ सप्टेंबपर्यंत कोळशाची वाहतूक थांबवण्याचा तसेच ३० ऑक्टोबपर्यंत संपूर्ण साठा वितरित करण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतला. या कोळशामुळे परिसरात धूलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्याचा स्थानिकांना त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र माझगाव परिसरातील सफर प्रकल्पाअंतर्गत लावलेल्या प्रदूषण मापन केंद्राच्या आकडेवारीनुसार शहरातील इतर भागांप्रमाणेच या भागातही प्रदूषकांचे प्रमाण असल्याचे दिसून येते. तरीही कोळशाच्या राखेमुळे होत असलेले प्रदूषण थांबवायला हवे व त्यासाठी कोळसा योग्य रीतीने हाताळण्याची यंत्रणा राबवली गेली पाहिजे याबाबत कोणाचेच दुमत नाही. मात्र मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा रिकामी करण्यासोबतच इतर उद्योगांना बळकटी देण्याचा विचारही यामागे असल्याचे काही तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टऐवजी गुजरातमधील दहेज तसेच महाराष्ट्रातील धरमतर या बंदरांवर कोळशाची वाहतूक करता येईल, असे पर्याय देण्यात आले आहेत. दहेज हे बंदर अदानी समूह तर धरमतर हे बंदर जिंदाल कुटुंबीयांच्या जेएसडब्ल्यूकडे आहे. विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावात हा दोन्ही कंपन्यांनी भाग घेतला होता. या कंपन्यांचा बंदरांशी व कोळसा व्यवसायाशी असलेला संबंध लक्षात घेता मुंबईतील कोळसा वाहतूक वळवण्याच्या मागणीकडे संशयाने पाहिले जात आहे.

पर्यावरण हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे वातावरणनिर्मिती होते, पण वेगवेगळ्या कारणांनी स्वत:चा उद्योग वाढवण्यासाठी रस्सीखेच करीत असलेल्या उद्योगांच्या इतिहासामुळे कोळशाची वाहतूक मुंबईतून बाहेर काढण्याच्या मागणीमागे उद्योगजगताचा हात नसेलच असे म्हणता येत नाही, असे अभ्यासक मयूरेश भडसावळे म्हणाले.