एकीकडे  स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी सर्व थरांतून प्रयत्न होत असतानाच वि. वा. चौधरी यांनी ‘मुलगाच कसा होईल’ असे पुस्तक लिहून नवा वाद निर्माण केला आहे. हे पुस्तक स्त्री-भ्रूणहत्येला खतपाणी घालणारे असून या पुस्तकावर बंदी घालावी आणि लेखक – प्रकाशकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विवेक पंडित यांनी आज विधानसभेत केली. त्यावर या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला दिले. विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे विवेक पंडित यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणली. स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असताना पुण्यातील वि. वा. चौधरी यांनी मुलगाच कसा होईल असे पुस्तक लिहिले आहे. ज्ञानविकास मुद्रणालय आणि राजेश प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक स्त्री-भ्रूणहत्येचा पुरस्कार करणारे असून त्यावर बंदी घालावी अशी मागणी पंडित यांनी केली. आरोग्य विभागाने या पुस्तकावर आणि प्रकाशकावर कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिकेस दिले असतानाही त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही, त्यामुळे राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.