योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आटा नूडल्स’मध्येही ‘मोनो सोडियम ग्लुटामेट’ची (एमएसजी) प्रमाणापेक्षा अधिक मात्रा असल्याचे आढळून आल्याने या नूडल्सही खाण्यास अयोग्य आहेत. त्यामुळे या नूडल्सच्या विक्रीवर राज्यात त्वरित बंदी घाला, अशी मागणी विरोधकांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे पतंजलीने ‘दिव्य पुत्रजीवक बीज’ हे औषध बाजारात आणले असून त्याने पुत्रप्राप्ती होते असा दावा केला आहे. हा कायद्याचा भंग असून बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली.

विधान परिषदेत आज काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला.