स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पणाला २६ फेब्रुवारी २०१६ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने केंद्र शासनाने मुंबई बंदराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना निवेदन सादर केले. मुंबई बंदराशी सावरकर यांच्या विशेष आठवणी निगडित आहेत. मातृभूमीचे पुन्हा दर्शन होईल की नाही याची कोणतीही शाश्वती नसताना त्यांनी ९ जून १९०६ रोजी मुंबई बंदरातून पर्शिया नौकेने लंडनला प्रयाण केले. आणि पुढे एक राजकीय बंदिवान म्हणून २९ जून १९१० रोजी त्यांना परत याच मुंबई बंदरात आणले गेले. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ ही कविता सावरकर यांचीच.त्यामुळे सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्टला सावरकर यांचे नाव द्यावे, असे गडकरी यांना सांगण्यात आले. मुंबई जवळ असलेल्या न्हावा शेवा बंदराला पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मुंबई बंदराला सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.स्मारकाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, हंसराज अहिर यांचीही भेट घेतली व सावरकर यांच्या आत्मार्पण स्मृतिवर्षांच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा केली.