मुंबई : जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीच्या सदोष खुबा रोपण प्रकरणाच्या चौकशीत दिरंगाई केली जात असून आठ वर्षे झाली तरी कंपनीविरोधात आरोपपत्र नोंद न झाल्याने केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे चौकशी द्यावी, अशी मागणी हीप इम्लांट पेशंट सपोर्ट ग्रुपकडून केली जात आहे.

कंपनीने उत्पादित केलेले आर्टिक्युलर सरफेस रिप्लेसमेंट (एसआर) सदोष असल्याचे केंद्रीय समितीने निश्चित केल्यानंतर रुग्णांना नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश दिले गेले. मात्र ही प्रक्रिया सदोष असून यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी हीप इम्लांट पेशंट सपोर्ट ग्रुपने केंद्रीय औषध नियंत्रण विभाग आणि केंद्रीय समितीला केली आहे.

खुबा रोपण शस्त्रक्रियेनंतर त्रास होत असला तरी दुसरी शस्त्रक्रिया करून नवीन एसआर बसविले नसलेले रुग्ण भरपाईसाठी पात्र नाहीत. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना भरपाई मिळणार नाही. प्रक्रियेतील या अटी अन्यायकारक आहेत, असे या मागणीमध्ये नमूद केले आहे.

अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरून रुग्णावर झालेल्या दुष्परिणामांचे मापन करून नये. एकापेक्षा अधिक एसआर बसविलेल्या रुग्णांना त्या तुलनेत भरपाई मिळणे आवश्यक आहे, असे पत्राद्वारे १३ फेब्रुवारीला समितीसमोर गटाकडून मांडली गेले. मात्र या घटनेला दोन महिने उलटले तरी अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असे या गटाचे समन्वयक विजय वोझाला यांनी सांगितले.

कंपनीने बाहेरील देशामध्ये कोटय़वधींची भरपाई दिली असूनही भारतामध्ये मात्र हात वर करत आहे.  रुग्णांना योग्य न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावे, असेही पुढे वोझाला म्हणाले.