मुख्य परीक्षेकरिता पदांच्या तुलनेत १३ ऐवजी  आठ पटच उमेदवार पूर्वपरीक्षेतून पात्र ठरविण्याच्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) निर्णयामुळे आयोगाचा मुख्य परीक्षेचा मूल्यांकनाचा भार जरी कमी होणार असला तरी कमी उमेदवार निवडले जाणार असल्याने परीक्षार्थीमध्ये मात्र चांगलीच नाराजी आहे.
मुळात प्रत्येक बाबतीत केंद्रीय परीक्षेशी (यूपीएससी) तुलना करणाऱ्या एमपीएससीने उमेदवार निवडीबाबत यूपीएससीपेक्षा वेगळीच भूमिका घेतली आहे. एमपीएससीने ५ एप्रिल रोजी राज्य सेवा पूर्वपरीक्षा घेतली. मात्र, या परीक्षेच्या निकालाचे निकष बदलले. नव्या निकषांनुसार भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी सुमारे ८ पट उमेदवारांची निवड पुढच्या मुख्य परीक्षेच्या टप्प्याकरिता करण्यात येईल, असे आयोगाने जाहीर केले.
आतापर्यंत आयोगाच्या सर्व परीक्षांसाठी जागांच्या १३ किंवा त्यापेक्षा अधिक पटीत उमेदवार मुख्य परीक्षेकरिता निवडले जायचे. ती ८ पटीवर आणल्याने आता मुख्य परीक्षेकरिता कमी उमेदवार निवडले जातील. यामुळे, एमपीएससीचा मुख्य परीक्षेच्या मूल्यांकनाचा भार कमी होणार असला तरी कमी उमेदवार निवडले जाणार असल्याने परीक्षार्थीनी अन्यायकारक निकष मागे घेण्याची मागणी एमपीएससीकडे केली आहे.
‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ने नागरी सेवा परीक्षा, २०१४मध्ये ११०३ पदांकरिता १६,९४३ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले होते. हे प्रमाण पदांच्या १५.३ टक्के होते. गेल्या वर्षी एमपीएससीने १४.६ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले होते. म्हणून राज्य आयोगाने केंद्राच्या निकषांचा विचार करून पूर्वीप्रमाणेच उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करावी, अशी मागणी करणारे पत्रच काही उमेदवारांनी आयोगाला लिहिले आहे.

या सुधारणा हव्यात
*सध्या आयोग सर्व परीक्षांसाठी उमेदवारांच्या प्रथम/मध्य/आडनावांचा आधार घेऊन बैठक व्यवस्था निश्चित करते. यामुळे, सामूहिक कॉपीचा गैरप्रकार  घडतो. हे टाळण्यासाठी बैठक व्यवस्थेची पद्धत बदलणे.
*सामान्य अध्ययन-२ पेपरमध्ये खोटे ओळखपत्र बनवून बोगस उमेदवार बसविले जाण्याचे प्रकार होत असल्याने परीक्षेच्या वेळेस मतदान किंवा आधारपत्र अनिवार्य करण्यात यावे. मोबाइलचा वापर रोखण्यात यावा.
*यूपीएससीप्रमाणे सामान्य अध्ययन-२ची काठीण्य पातळी सर्व शाखेतील पदवीधरांचा समान पातळीवर विचार करून ठरविण्यात यावी.
*प्रश्नपत्रिकेतील एखाद्या प्रश्नाच्या, उताऱ्यांच्या इंग्रजी किंवा मराठी भाषांतराबाबत असलेली संदिग्धता टाळावी.