चेंबूरमधील टाटा कंपनीला कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यास स्थानिकांनी विरोध दर्शविला असून तो मुंबईबाहेर उभारावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
तीन तेल कंपन्यांचे शुद्धीकरण प्रकल्प, राष्ट्रीय रासायनिक खत प्रकल्प त्याचप्रमाणे देवनार येथील डंपिंग ग्राऊंड आणि सध्या सुरू असलेला टाटा पॉवरचा प्रकल्प यामुळे चेंबूर आणि परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. त्यातच ट्रॉम्बे येथे टाटा पॉवर कंपनीने कोळशावर आधारित ५०० मेगाव्ॉट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकल्पातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, यासाठी पर्यावरण यंत्रणाही बसविण्याचे कंपनीने मान्य केले आहे. मात्र या प्रस्तावाला पर्यावरणीय मंजुरी मिळविण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या जनसुनावणीमध्ये चेंबूरच्या रहिवाशांनी कडाडून विरोध केला. दररोज सुमारे सात ते आठ टन कोळसा जाळण्यात येणार असल्याने चेंबूरमधील वायू प्रदूषणामध्ये आणखी भर पडेल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली होती. या जनसुनावणीतील हरकतींनंतरही ट्रॉम्बे येथे तेल आणि वायूवर आधारित प्रकल्प कोळशावर परावर्तित करण्याचा प्रस्ताव मान्य करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे चेंबूरच्या रहिवाश्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी हा प्रकल्प मुंबईबाहेर हलवावा, अशी मागणी सुमारे १२०० नागरिकांनी एका पत्राद्वारे केली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबईचे जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.