गणेशोत्सवादरम्यान ‘शांतताक्षेत्रां’चा अतिरेक कमी करावा, तसेच शहरातील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. त्यावर गणेशोत्सवासाठी मंडळांना लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य शासनाकडून केले जाईल. तसेच ज्या मंडळांवर कायदा व सुव्यवस्था भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घेण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
गणेशोत्सवानिमित्त राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बठक सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शहरात शांतताक्षेत्रांचा अतिरेक होत असून उत्सवकाळात यातून सूट द्यावी, किंवा ही क्षेत्रे कमी करावीत, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आली. सायंकाळी शाळा संपल्यानंतर शांतता क्षेत्रे काढावीत अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. मात्र हा केंद्राचा  कायदा असल्याने त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र गणेशोत्सवापूवी शहर तसेच उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत, असमतोल रस्त्यांबाबत विशेष काळजी घेण्यात यावी, तसेच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. गणेशोत्सव काळात पारंपारिक वाद्ये रात्री १२ पर्यंत वाजविण्याची परवानगी ध्वनिप्रदूषणविषयक नियमांचे पालन करून द्यावी असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.