दहावी, बारावीच्या परीक्षा आल्या की शिक्षक संघटनांच्या आंदोलनाला चालना मिळते आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू होतो. न्याय्य मागण्या वेळीच मान्य न करणारे शासन आणि मागण्या मान्य होईतोवर काम न करण्याचा शिक्षकांचा हट्ट यात भरडले जातात विद्यार्थीच. यंदाही तेच होण्याची लक्षणे असून ३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे सातत्याने आंदोलने सुरू आहेत. मागील वर्षीही त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत तो मागे घेत नंतर पेपर तपासणीच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता. याचा फटका पेपरतपासणीला बसला होता. शासनाच्या लेखी आश्वासनानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला होता.
यानंतर आता वर्ष होत आले तरी तेव्हा शासनाने ‘मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे’ दिलेले आश्वासन मोडित काढले आहे. या मागण्यांवर आजवर चर्चा करण्याचेही गांभीर्य शासनाने दाखविले नाही. यामुळे गुरुवारी मुंबईत झालेल्या महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात राज्यातील ६० हजार शिक्षक सहभागी होणार असून याचा फटका १५ लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे.
शासनाने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांवर कोणताही सकारात्मक विचार केलेला नाही. आमच्या प्रमुख मागण्यांपैकी केवळ एकच मागणी मान्य केली आहे. अन्य मागण्यांवर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या बैठकीत या प्रश्नांवर चर्चाही झाली नाही. शासनाने गेली अनेक वष्रे केवळ वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याचा आरोप महासंघाचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी केला. या आंदोलनाला संस्थाचालक महासंघ तसेच राज्य मुख्याध्यापक महासंघाने पाठींबा जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले.

असा होईल परिणाम
या बहिष्काराचा मोठा फटका बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. ३ फेब्रुवारीपासून विज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहे. याचबरोबर कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षाही याचदरम्यान पार पडणार आहे. या परीक्षा लांबल्या तर याचा परीणाम लेखी परीक्षांवरही होण्याची भीती आहे. पुढे याचा परीणाम दहावीच्या परीक्षांवरही बसण्याची शक्यता आहे.

शिक्षक महासंघाच्या प्रमुख मागण्या
* अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई रद्द करावी.
* विज्ञानाच्या लेखी परीक्षेत पूर्वीप्रमाणे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र दोन परीक्षा व्हाव्यात.
* विज्ञानाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्य परीक्षक नेमावेत.
* २४ वर्षांच्या सेवेनंतर सर्वाना निवड श्रेणी द्यावी.
* २००८-०९पासूनच्या वाढीव पदांना मान्यता द्यावी.
* ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा कराव्यात.
* कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करावे.

मागील वर्षांतील बहिष्कार
* बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार.
* पदवीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार.