स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप-शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका काही प्रमाणात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यता आहे. शेट्टी आणि काँग्रेसचे ‘पडद्या’मागचे संबंध लक्षात घेता त्यांचा प्रभाव असलेल्या पट्टय़ातील मतदारसंघ काँग्रेसला सोडून ते समोरासमोर येतील, असे डावपेच राष्ट्रवादी आखत आहे.
ऊस दरावरून राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनामुळे शेतकरी वर्गात त्यांच्याबद्दल चांगली प्रतिमा तयार झाली. गेल्या वर्षी तर शरद पवार यांनी शेट्टी यांच्या आंदोलनामागे जातीच्या राजकारणाची किनार असल्याचा आरोप केला होता. एकंदरीतच शेट्टी यांच्या आंदोलनामुळे राष्ट्रवादीचे जास्त नुकसान झाले. राजू शेट्टी बरोबर आल्याने भाजप-शिवसेना युतीला पश्चिम तसेच दक्षिण महाराष्ट्रात साहजिकच फायदा होईल. विशेषत: कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील शिरुर  तसेच बारामती या मतदारसंघांत परिणाम होऊ शकतो.
राष्ट्रवादीचे नुकसान होत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी शेट्टी यांनी पडद्याआडून मदतच केली. गेल्या निवडणुकीत हातकणंगले आणि सांगली मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि शेट्टी यांनी परस्परांना मदत केल्याचे बोलले जाते. हातकणंगले या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून शेट्टी विजयी झाले होते. शेजारील सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडपणे बंडखोरी करणाऱ्या अजित घोरपडे यांना मदत केली होती. त्याची प्रतिक्रिया हातकणंगलेमध्ये उमटून येथील काँग्रेस नेत्यांनी शेट्टी यांना मदत केली होती.
काँग्रेसचे प्रतिक पाटील यांना मदत होईल, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली होती, असे काँग्रेसच्या गोटातच बोलले जाते. मध्यंतरी  मतदारसंघातील कार्यक्रमासाठी शेट्टी यांनी राज्यमंत्री प्रतिक पाटील यांना निमंत्रित केले होते याकडे लक्ष वेधण्यात येते. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तासंपादनाकरिता काँग्रेस आणि शेट्टी यांची युती झाली आहे. विदर्भातील चार जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीने भाजपला मदत होईल अशी व्यवस्था केली. ही युती राष्ट्रवादीने तोडावी यासाठी काँग्रेसने दबावाचे राजकारण सुरू केले असता आधी कोल्हापूरमध्ये काँग्रेसने शेट्टी यांच्याशी काडीमोड घ्यावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.

काँग्रेसचा कोल्हापूरवर डोळा
हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसने घ्यावा, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका असली तरी काँग्रेसचा आग्रह ?कोल्हापूर मतदारसंघासाठीच आहे. गेल्या वेळी अपक्ष निवडून आलेले सदाशिव मंडलिक यांनी काँग्रेसला साथ केल्याने या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. हातकणंगले मतदारसंघ कठीण असल्यानेच राष्ट्रवादीचे नेतृत्व हा मतदारसंघ काँग्रेसच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते.