आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांना बरोबर घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार काँग्रेसने  माजी आमदार टी.एम. कांबळे यांच्या नेतृत्वाखालील डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षाबरोबर निवडणूक आघाडीसंदर्भात चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते समाधान नावकर यांनी दिली.
काँग्रेसबरोबर सध्या एकही आरपीआयचा गट नाही. मागील विधानसभा निवडणुकीनंतर रामदास आठवले यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाने गेल्या वर्षी काही महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर समझोता केला होता, परंतु त्याचा फारसा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. गवई गटही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. गंगाधर गाडे यांचाही गट राष्ट्रवादीसोबत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युतीचा हात पुढे केला होता, परंतु काँग्रेसकडूनच म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची आघाडी होणेही अवघड दिसत आहे. मात्र काँग्रेसने आता हळू हळू आरपीआयच्या काही गटांना आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली आहे.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात २ जूनला होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार नंदिनी निलेश पारवेकर यांना पाठिंबा देण्याची विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी टी.एम.कांबळे यांना केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्येही कांबळे गटाशी समझोता करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे. त्यानुसार कांबळे गटाने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर युती करण्याची डेमाक्रॅटिक आरपीआयचीही तयारी आहे.