नौदलातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या वाहनांमधून मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ वाहनांच्या काचा फोडून मोबाइल, पैशांचे पाकीट चोरण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाआधारे प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नौदलातर्फे रविववारी ‘इंडियन ऑइल वेस्टर्न नेव्हल कमांड’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मुंबईतील मॅरेथॉनच्या मार्गिकेवर वाहने उभी करण्यास मनाई होती. काही स्पर्धकांनी ही मार्गिका वगळून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सच्या परिघात वाहने उभी केली. धावताना मोबाइल, पैशांचे पाकिटाचा अडसर नको म्हणून ती वाहनात ठेवण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टर्लिग चित्रपट गृहाजवळ उभ्या नऊ वाहनांच्या काचा फोडून चोरी करण्यात आली. या वाहनांच्या मालकांनी ठेवलेल्या वस्तू काचेतून सहजरीत्या दिसत होत्या. ज्या स्पर्धकांनी आपल्या वस्तू डिक्कीत ठेवल्या त्या सुरक्षित राहिल्या, अशी माहिती चौकशीतून पुढे आली.

‘मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या वाहनांची तोडफोड करून मोबाईलसह मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली.