मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नोटाबंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे काळा पैसा अर्थव्यवस्थेत परत येईल असा दावा करण्यात आला होता. मात्र, तसे काही घडले नाही, उलट अर्थव्यवस्थेचे यामुळे नुकसान झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नोटबंदीने देशाच्या अर्थव्यस्थेलाच जिवंत जाळल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे केली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल करताना पाटील ट्विटमध्ये म्हणतात, “नोटबंदीला आज ३ वर्षे पूर्ण झाली. मोदी सरकारच्या या निर्णयामुळं रांगेत उभं राहून जवळपास दीडशे लोकांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मोठ्या उद्योगांबरोबरच छोटे उद्योगधंदे किती बुडाले हे मोजताही येणार नाही.”

आणखी वाचा- “पुलंच्या आठवणी जागवण्याचा दिवस मोदींमुळे ठरतोय काळा दिवस”

नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा बाहेर येईल असा दावा करण्यात आला होता. मात्र, जितक्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या त्याच्या जवळपास ९९ टक्के नोटा पुन्हा रिझर्व्ह बँकेकडे आल्या होत्या. त्यामुळे नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल हा अंदाज फसल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ८ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणूनही पाळण्यात येत आहे.

सध्या अर्थव्यवस्थेची बिघडलेली स्थिती ही मोदी सरकारने अचानक घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे.