20 February 2020

News Flash

तंत्रमहोत्सवाला निश्चलनीकरणाचा फटका!

वस्तुरूपी प्रायोजकांच्या संख्येत घट; गुंतवणूकदार वसुलीच्या चिंतेत

निश्चलनीकरणामुळे यंदा तंत्रमहोत्सवातील दुकाने ओस पडली आहेत. 

वस्तुरूपी प्रायोजकांच्या संख्येत घट; गुंतवणूकदार वसुलीच्या चिंतेत

देशात विविध ठिकाणी बसत असलेला निश्चलनीकरणाचा फटका यंदा तंत्रमहोत्सवालाही बसला आहे. महोत्सवाला मिळणाऱ्या वस्तुरूपी प्रायोजकांची संख्या घटलीच, याचबरोबर महोत्सवातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही याचा फटका बसला आहे. यामुळे यंदा विक्रेत्यांना आपण केलेला खर्च तरी वसूल होणार का? अशी चिंता भेडसावत आहे.

निश्चलनीकरणामुळे महाविद्यालयीन महोत्सवाला यंदा प्रायोजक मिळवण्यात चांगलीच दमछाक होत होती. मात्र आयआयटीमधील या तंत्रमहोत्सवाला याचा फटका बसणार नाही असा विश्वास आयोजकांना होता. यंदाच्या तंत्रमहोत्सवात बक्षिसाची रक्कम किंवा अन्य प्रायोजकांचा फटका बसला नसला तरी दरवर्षीपेक्षा यंदा वस्तुरूपाने  प्रायोजकत्व देणाऱ्यांची संख्या मात्र चांगलीच घटली आहे. मागच्या वर्षी एका उत्तेजक पेयाच्या कंपनीने वस्तुरूपी प्रायोजकत्व देताना आयोजकांना एक हजार उत्तेजक पेयाचे टिन्स मोफत दिले होते. ही मोफत मिळालेली उत्तेजक पेये पाहुण्यांसाठी तसेच स्वयंसेवकांना दिली जात असत. मात्र यंदा या कंपनीने केवळ ४०० टिन्स दिल्याचे मुख्य आयोजक चमूतील एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

असाच फटका लिखाणासाठी दिल्या जाणाऱ्या नोंदवही, पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि अन्य प्रायोजकत्वाला बसल्याचेही या विद्यार्थ्यांने नमूद केले. यामुळे यंदा एकूण प्रायोजकत्वाच्या आकडय़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत सात ते आठ लाखांनी वाढ झाली असली तरी वस्तुरूपी प्रायोजकत्व नसल्याने त्या वस्तूंच्या खरेदीत अतिरिक्त पैसे खर्च झाल्याचेही त्याने नमूद केले.

आयोजकांप्रमाणेच महोत्सवात बाहेरून येणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच महोत्सवाच्या टी-शर्ट विक्रीवरही याचा फटका बसला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही टेकफेस्टची टी-शर्ट विक्री करणारा कक्ष सुरू केला. मात्र गेल्या वर्षी तीन दिवसांत एक हजारपेक्षा जास्त टी-शर्ट विकले गेले होते पण या वर्षी केवळ ७०० टी-शर्टच विकले गेल्याचे विक्रेता अनुराग शुक्ला याने स्पष्ट केले. अनेक ग्राहक दोन हजार रुपयांची नोट देतात पण प्रत्येकाला सुटे पैसे देणे शक्य नसल्याने ग्राहक परततात म्हणून आमच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचेही तो म्हणाला. तर दरवर्षी दिवसाला १२०० ते १४०० बिर्याणींचा खप होत असे पण यंदा निश्चलनीकरणामुळे दिवसाला ६५०च बिर्याणी विकल्या गेल्याचे पवईस्थित ब्रदर्स बिर्याणी हाऊसचे अरुण विग यांनी सांगितले.

कॅफे चोकोलेडच्या खुशबू टंक यांनीही दरवर्षीपेक्षा यंदा विक्री ५० टक्क्यांनी घटल्याचे सांगितले. टंक दरवर्षी तंत्रमहोत्सवात तीन ठिकाणी दुकाने चालवितात. यावर्षी त्यांनी पेटीएमचाही पर्याय स्वीकारला तरीही  विक्रीत घट झाल्याचे त्या म्हणाल्या. तर केवळ सुटय़ा पैशांमुळे अनेक ग्राहक परतत असल्याने व्यवसायावर २० ते ३० टक्के परिणाम झाल्याचे फन अँड फूडचे गौरव प्रसाद यांनी सांगितले. तर मुंबईचा लाडका वडापावच्या विक्रीवरही याचा परिणाम दिसून आला असून हंगर फूडचे मालक फाहिम सय्यद यांनी मागच्या वर्षीपर्यंत दररोज एक हजाराच्या वडापावची विक्री यंदा मात्र निश्चलनीकरणामुळे दिवसाला ७०० वडापावपर्यंत घसरल्याचे सांगितले. निश्चिलनीकरणामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पॉकिटमनीमध्येही कपात झाल्याने विद्यार्थी काटकसर करू लागले आहेत. बहुतांश विद्यार्थी १००-२०० रुपयांपेक्षा कमी किमतीतील खाद्यपदार्थाना पसंती देत असल्याचे निरीक्षणही विक्रेत्यांनी नोंदविले.

रविवार गर्दीचा

रविवारी तंत्रमहोत्सवाकडे तंत्रप्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांची अधिक कुमकही मागविली होती. रविवारी मेक इन इंडिया या विषयावर परिसंवाद झाला. याचबरोबर इस्रोचे संचालक ए. एस. किरण कुमार, रिझव्‍‌र्ह बँकेच्या दीपाली पंत जोशी, अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांची व्याख्याने झाली. याचबरोबर रोबो वॉर, फूलथ्रोटनसह विविध स्पर्धाची अंतिम फेरीही रंगली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठीही अनेकांनी गर्दी केली होती.

First Published on December 19, 2016 2:06 am

Web Title: demonetisation effects on technology festival
Next Stories
1 मुल्याधारित शिक्षणही महत्वाचे!
2 झोपु प्रकल्पातील बेकायदा बांधकामांवर कुऱ्हाड!
3 भाजपच्या इंजिनाला उत्तर भारतीयांचा डबा
Just Now!
X