News Flash

‘फॅशन’च्या वेगाला नोटाबंदीची वेसण!

निश्चलनीकरणानंतर कपडय़ांपासून ते चप्पल विक्रेत्यांपर्यंत अनेकांनी आपले व्यवहार रोखरहित करण्याचे ठरवले.

फॅशन स्ट्रीट, लिंक रोडवरील बाजार उठला

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबरला बाद झाल्यानंतर बसलेला मुंबईचा फॅशन बाजार अद्याप सावरलेला नाही. फॅशन स्ट्रीट, लिंक रोड येथे नोटाबंदीमुळे सुरू झालेली ग्राहक मंदी ५० दिवसांनंतरही सुरूच असल्याने एरवी खरेदीदारांच्या गर्दीत हरवून जाणारे येथील छोटेमोठे व्यावसायिक अक्षरश: हातावर हात ठेवून बसल्याचे चित्र दिसते आहे.

वांद्रय़ातील ‘लिंक रोड’ उपनगरातील फॅशन बाजारपेठेची पंढरी. लग्नापासून पाटर्य़ापर्यंतच्या फॅशनच्या वेगवेगळ्या गरजा भागविणारी ही बाजारपेठ सध्या ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. चपला, कपडे, दागिने, पर्सेस आदी वस्तूंकरिता प्रसिद्ध असलेली ही बाजारपेठ मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, कल्याण येथील तरुणाईलाही भुरळ घालते. पण, निश्चलनीकरणामुळे येथील व्यावसायिकांना व्यवसायात दिवसाला किमान ३० ते ४० टक्के इतका तोटा सहन करावा लागत आहे. ५०० रुपयांच्या नोटाच उपलब्ध नसल्याने अनेक ग्राहक २०० रुपयांच्या वस्तूसाठीही २००० रुपयांची नोट काढून देतात. सुटय़ा नोटांच्या या चणचणीचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तर रोखरहित व्यवहार करण्यासाठी ‘नेट’ साथ देत नसल्याने तोही मार्ग ग्राहकांच्या पचनी पडत नाही. याचा एकत्रित परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.

निश्चलनीकरणानंतर कपडय़ांपासून ते चप्पल विक्रेत्यांपर्यंत अनेकांनी आपले व्यवहार रोखरहित करण्याचे ठरवले. मात्र, ग्राहकांपैकी अनेकांकडे इंटरनेटचा वेग ‘२ जी’चा असल्याने व्यवहार उरकण्यासाठी ग्राहकांना १०-१५ मिनिटे थांबून राहावे लागते, असे लिंक रोड येथील कपडे विक्रेते मुस्तफा यांनी सांगितले.

‘माझ्या दुकानात १०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंतच्या वस्तू उपलब्ध आहेत. मात्र, बाजारात ५०० रुपयांच्या नोटा उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. सध्या दिवसाला ३० टक्के नुकसान आम्ही सहन करत आहोत,’ असे चप्पल विक्रेता फिरोज शेख यांनी सांगितले. अनेक जण मुंबईबाहेरून येथे खरेदीकरिता येतात. परंतु, त्यांच्या इंटरनेटला एकतर ‘रेंज’ किंवा वेग नसतो. व्यवहार करण्यासाठी कित्येक मिनिटे दुकानासमोर ग्राहक उभे राहतात. त्यामुळे दुकानासमोरची गर्दी वाढल्यासारखी वाटते. दुकानासमोर गर्दी दिसली की इतर ग्राहक दुकानात येण्याचे टाळतात, अशी रोखविरहित व्यवसायातील अडचण शेख यांनी नमूद केली. निश्चलनीकरणानंतर धंदा तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी बसला आहे. रोखरहित व्यवहार सुरू असले तरी त्याच्या वापराची पुरेशी माहिती नाही, अशी प्रतिक्रिया मलमल कपडय़ांच्या दुकानातील व्यवस्थापक नगमा यांनी व्यक्त केली.

अशीच काहीशी अवस्था फोर्टमधील फॅशन स्ट्रीटची आहे. नाताळच्या तोंडावर येथील बाजारात काहीसा उत्साह संचारला होता. परंतु, आता तोही ओसरला आहे. तसाही नाताळचा उत्साह यंदा दिसून आला नाही, अशी येथील विक्रेत्यांची खंत होती. येथील कादीर नामक विक्रेते म्हणाले, ‘नाताळमध्ये धंदा थोडा सावरला. परंतु, पुढील दिवसांबाबत अनिश्चितता असल्याने हातात आलेला पैसा जपून वापरावा लागत आहे.’ आणखी एक विक्रेते राजुभाई म्हणाले, ‘ग्राहकांना २००० रुपयांचे सुटे देताना खूप त्रास होतो.’

काही ठिकाणी अर्थव्यवस्था उधारीवरच चालल्याचे चित्र आहे. अनेकांनी माल उधारीवर घेतला आहे. स्वाइप मशीन आणि पेटीएम यांचा सुविधेपेक्षा त्रासच अधिक आहे. नोटाबंदीमुळे येथील खाद्यविक्रेत्यांचाही धंदा मंदावला आहे. पिंटू नामक कापड विक्रेत्याने धंदा ८० टक्क्यांपर्यंत सावरल्याचे सांगितले. तर आमच्यासारख्या छोटय़ा व्यापाऱ्यांना नोटाबंदीमुळे अजूनही फरक पडतो आहे. अद्याप ६०-७० टक्केच धंदा होतो आहे. सुट्टय़ांच्या टंचाईमुळे  धंद्यावर पाणी सोडावे लागते. त्यामुळे, सरकारने नोटांची अडचण  सोडवावी, अशी अपेक्षा ‘स्टोल’ विक्रेता सतीशकुमार सिंग यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 2:21 am

Web Title: demonetisation hit hard fashion street link road market
Next Stories
1 पालिकेचा कागदांवर ३१ कोटी रुपयांचा खर्च!
2 शहरबात : तोंडी लावायला लोकशाही!
3 आता दहिसरवासीयांचा लोकलसाठी हट्ट!
Just Now!
X