मी वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना उत्तर देईन, असे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले असतील तर त्यांचे सर्वप्रथम आभारच मानतो. त्यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल आदर असल्याचे यावरून दिसते. मात्र, सर्वसामान्य लोकांचा त्रास कमी होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना आनंद होईल, असा ‘मार्मिक’ टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाला खडे बोल सुनावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

नोटाबंदीच्या निर्णयाला सरकारमध्ये सहभागी झालेला शिवसेना पक्ष सातत्याने विरोध करत आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आज दिल्लीत गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांना नरेंद्र मोदी यांनी चांगलेच धारेवर धरले. मी जेव्हा वर जाईन, त्यावेळी चांगले काम करून आलो आहे, असे बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन. तुमची हिंमत होईल का, हे मला माहिती नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावले होते. या चर्चेनंतर शिवसेनेने नोटाबंदीच्या विरोधातील मोर्चांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. पंतप्रधानांनी खासदारांना सुनावल्यानंतर शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे, असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना खडे बोल सुनावणाऱ्या पंतप्रधानांना टोला लगावला आहे.

देशात चलनाची चलबिचल सुरू आहे. मी वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना उत्तर देईन असे जर पंतप्रधान मोदी म्हणाले असतील, तर त्यांचे आभार मानतो. त्यांच्या बोलण्यावरून बाळासाहेंबांबद्दल त्यांच्या मनात किती आदर आहे, हे दिसून येते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वसामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. ती जर उत्तरे सर्वसामान्य लोकांना मिळाली आणि त्यांचा खरोखरच त्रास कमी झाला तर, बाळासाहेंबांनाही त्याचा जास्त आनंद होईल, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना फैलावर घेणाऱया मोदींना अप्रत्यक्ष इशाराच दिला. मी अजूनही टोकाची भूमिका घेतलेली नाही. तशी वेळ येऊ नये, हीच अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने मुस्लिम बँकांना परवानगी दिल्यावरून भाजपला लक्ष्य केले. जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारणे अथवा त्या बदलून देण्यास परवानगी नाकारत आहात, पण दुसरीकडे मुस्लिम बँकांना परवानगी देत आहात. आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत, तेच कळत नाही, असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान, जिल्हा बँकेत जुन्या नोटा स्वीकारणे तसेच त्या बदलून देण्यास परवानगी नाकारली आहे. जिल्हा बँकांना नोटा बदलण्याची परवानगी दिली तर, या बँका काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला होता.