निश्चलनीकरणानंतर रोख लाच घेण्यावर आलेली बंधने लक्षात घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सुरुवातीला मित्र वा नातेवाईकांच्या नावे धनादेश घेण्यास सुरुवात केली होती. परंतु हे अंगाशी येईल याची कल्पना आल्यानंतर आता सोन्याची नाणी, बिस्किटे स्वरूपात लाचेचा स्वीकार करण्याचा पर्याय अवलंबिला आहे. मोठी रक्कम असल्यास सुरुवातीला काही रक्कम घेऊन उर्वरित रकमेसाठी प्रॉमिसरी नोट हा नवा फंडा अंगीकारला आहे. त्यामुळे निश्चलनीकरणानंतरही भ्रष्टाचार कमी झालेला नाही, हे स्पष्ट होत आहे.

भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात प्रामुख्याने ही पद्धत मोठय़ा प्रमाणावर अवलंबिली जात आहे. निश्चलनीकरणानंतर रोकड उपलब्ध होणे मुश्कील असल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा दावा केला जात होता. परंतु त्यावर या अधिकाऱ्यांनी पर्याय शोधले आहेत. त्यापैकी सोन्याची नाणी, बिस्किटे हा पर्याय दलालांमध्ये खूपच प्रिय झाला आहे.

म्हाडामध्ये चटईक्षेत्रफळ वितरणामुळे प्रति चौरस फूट दर लाच घेण्याची पद्धत आहे. साधारणत: १०० ते ५०० रुपये प्रति चौरस फूट दर हा अधिकाऱ्यानुसार बदलला जातो. एका इमारतीच्या देकार पत्रासाठी साधारणत: १० ते १५ लाखांची लाच द्यावी लागते. निश्चलनीकरणानंतर ही रक्कम कमी होईल, असा अंदाज होता. परंतु रोकड उपलब्ध नसेल तर धनादेश द्या, अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी ही रक्कम स्वीकारण्याचे ठरविले. काही अधिकाऱ्यांनी मित्र वा नातेवाईकांच्या नावे धनादेशही घेतले, परंतु अशा पद्धतीने लाच घेणे हे कधी तरी महागात पडू शकते, याची कल्पना असलेल्या या अधिकाऱ्यांनी मग सोन्याची नाणी, बिस्किटांची मागणी केली. विकासकांच्या वतीने काम करणाऱ्या दलालांनी ती मागणीही पूर्ण केली. नेहमीच्या दलालांकडून कामे करताना प्रसंगी अधिकाऱ्यांकडून प्रॉमिसरी नोट स्वीकारली जात आहे. रोकड मोठी असल्यामुळे ठरावीक मुदतीत देण्याची अट या प्रॉमिसरी नोटमध्ये नमूद आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून नवा प्रकार

  • झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातही दलालांचे राज्य आहे. प्रामुख्याने वास्तुरचनाकार हेच दलाल म्हणून वावरत असतात.
  • त्यांनीही सोन्याची नाणी वा बिस्किटांच्या स्वरूपात लाच द्यायला सुरुवात केली आहे.
  • काही अधिकाऱ्यांनी महागडे मोबाइल फोनही लाच म्हणून स्वीकारले आहेत, अशी माहिती एका बडय़ा विकासकाचे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
  • काही अधिकाऱ्यांनी लाचेच्या रकमेपोटी तीन ते चार आयफोनही घेतल्याचे हा अधिकारी म्हणाला.