News Flash

मुंबईत १५ दिवसांत डेंग्यूचे ३ बळी

गेल्या दोन महिन्यात डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे या पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात डेंग्यूने तिघांचे बळी घेतले आहेत. डेंग्यूची लागण झाल्यामुळे ऑगस्टमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन महिन्यात डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात १६४ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या १६५९ इतकी आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ९३ इतकी होती. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मुंबईत डेंग्यूचे २९३ रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबरमध्ये डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये वांद्रे येथील ३४ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

५ सप्टेंबर रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला महिनाभरापासून स्थूलता, झोपेच्या आजाराचे निदान झाले होते. त्यात डेंग्यूचे निदान होण्याच्या पाच दिवसांपूर्वी हा तरुण परदेश सहल करून आला होता. डेंग्यूमुळे १० सप्टेंबर रोजी जुहू येथील नऊ वर्षीय मुलगा व धारावी येथील लहान मुलीचा मृत्यू झाला.

पालिकेची तपासणी

१ ते १२ सप्टेंबर दरम्यान पालिकेने मुंबईतील ५१६० चाळींना भेट दिली होती. त्यामध्ये १९७४ घरांमध्ये डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या सापडल्या होत्या.

डेंग्यूबरोबरच सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात लेप्टोचे ३४ रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घाटकोपरमधील १९ वर्षीय व अंधेरीतील २७ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

घ्यावयाची काळजी

* घरात व आजूबाजूच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.

* उघडय़ावरील अन्नपदार्थ खाणे टाळा.

* रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक अन्नाचे सेवन करा.

* ताप, सर्दी यांसारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

* रस्त्यावर साचून राहिलेल्या पाण्यात चालणे टाळा.

डेंग्यू –            १६४ (३ मृत्यू)

लेप्टो –          ३४ (२ मृत्यू)

मलेरिया –      ४१८

गॅस्ट्रो –          २८६

कावीळ –        ७०

पटकी –         १

( १ ते १५  सप्टेंबरपर्यंतचे रुग्ण )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2017 4:12 am

Web Title: dengue claims 3 victim in last 15 days in mumbai
टॅग : Dengue
Next Stories
1 शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास जलदगतीने करण्याच्या सूचना
2 पाणी तुंबण्याच्या समस्येवर विशेष बैठक
3 राणेंची चलाखी उघड होताच काँग्रेसचा धक्का!
Just Now!
X