News Flash

डेंग्यूचा ‘ताप’!

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरातही डेंग्यरुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होताना दिसत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत रुग्णसंख्येत वाढ

राजधानी दिल्लीत चिकुनगुनिया आजाराने थैमान घातले असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व परिसराला डेंग्यूचा विळखा पडत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरच्या दहा दिवसांत मुंबईत डेंग्यूचे १२२ रुग्ण आढळले असून संशयित डेंग्यूरुग्णांची संख्या तब्बल दीड हजारांपर्यंत पोहोचली आहे. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरातही डेंग्यरुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होताना दिसत आहे.

पावसाने फिरवलेली पाठ आणि उष्म्यात झालेली वाढ यांचा एकत्रित परिणाम होऊन डासांच्या उत्पत्तीत वाढ होण्यास पोषक वातावरण सध्या तयार झाले आहे. त्यामुळेच हिवताप आणि डेंग्यू या आजारांची साथ वाढीस लागली आहे. या दोन्ही आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या भागांत मोठय़ा प्रमाणात फवारणी केली जात आहे. डेंग्यू बळावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस या डासाची उत्पत्ती रोखण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे या विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले. भायखळा आणि परिसरात डासांची उत्पती वाढली असून रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. ऑगस्टमध्ये डेंग्यूमुळे दोघांचा तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात एकाचा अशा तीन डेंग्यूबळींची नोंद शहरात झाली असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. यासंदर्भात पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, पुणे व नगरमध्येही डेंग्यूची साथ पसरली असून पुण्यात एक हजार रुग्ण आढळले आहेत.

ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांमध्येही डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून उच्चभ्रू वसाहतींमध्ये या आजाराची साथ मोठय़ा प्रमाणात पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे महापालिका हद्दीत दोन महिन्यांत तिघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. कल्याण-डोंबिवलीत गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे ५६५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यावर उपाय म्हणून कल्याण, डोंबिवली महापालिकेतर्फे घराघरांतील पाण्याच्या टाक्यांची तपासणी आणि धुराची फवारणी यांसारखे उपाय अवलंबले जात आहेत.

डासांच्या संख्येत वाढ :

भायखळा, रे रोड, शिवडी, डोंगरी, चारकोप आणि खार

रुग्णसंख्या

 • डेंग्यू : १२२ (सप्टेंबरमध्ये)
 • एकूण संशयित : १५५३
 • लक्षणे : ४६०७
 • हिवताप : एक हजारांहून अधिक
 • अतिसार : ८००.

डेंग्यूची लक्षणे

 • अचानक जास्त ताप येणे
 • डोकेदुखी, सांधेदुखी किंवा पाठदुखी.
 • उलटय़ा होणे
 • त्वचेवर चट्टे उठणे किंवा ओरखडे उठणे.
 • डोळ्यांची जळजळ
 • रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाटय़ाने घसरते.

घ्यावयाची काळजी

 • वातानुकूलन यंत्र, फ्रीज वेळोवेळी स्वच्छ करा
 • मनी प्लांट, फ्लॉवर पॉटमधील पाणी वेळोवेळी बदला
 • जुने टायर, थर्माकोल, जुने हेल्मेट, भंगार घरातून हद्दपार करा
 • घराच्या खिडक्यांना डासप्रतिबंधक जाळ्या बसवून घ्याव्यात

रॅकेटच्या विक्रीत वाढ

 • डासांना मारण्यासाठी विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या रॅकेटची सध्या चलती आहे.
 • पूर्वी ही रॅकेटची किंमत २०० रुपये असायची मात्र १००-१२५ रुपयांना ती मिळायची.
 • परंतु आता पुन्हा या रॅकेटची मागणी वाढल्याने विक्रेते ती २०० रुपयांनाच विकत आहेत.
 • रॅकेटच्या विक्रीत दुपटीने वाढ झाल्याचे चर्चगेटमधील एका फेरीवाल्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 3:18 am

Web Title: dengue fever in mumbai
Next Stories
1 भाजपविरोधात संघात खदखद!
2 बाळासाहेब स्मारक न्यासामध्ये समावेशावरून राजकारण
3 दबावाच्या राजकारणात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी वजनदार!
Just Now!
X