News Flash

डेंग्यूने तिघांचा मृत्यू

लेप्टोचे दोन, तर मलेरियाचा एक बळी

dengue
प्रतिनिधिक छायाचित्र

लेप्टोचे दोन, तर मलेरियाचा एक बळी

पावसाळा संपताना येणारी डेंग्यूची साथ यंदा मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवडय़ातच पसरली आहे. डेंग्यूने तीन रुग्ण दगावले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ातही एक रुग्ण दगावला होता. ऑगस्टमध्ये लेप्टोने दोघांचा, तर मलेरियाने एकाचा मृत्यू झाला.

महापालिका रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्याही दुप्पट झाली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात डेंग्यूचे ७९ रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. याच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ७४ होती. त्यापैकी तीन रुग्ण दगावले. काळबादेवीतील २० वर्षीय तरुणाचा, वांद्रेतील ३५ वर्षीय तरुणाचा आणि परळमधील ५२ वर्षीय महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

मोठय़ा संख्येने रुग्ण आढळल्याने पालिकेने संबंधित भागातील ११६९ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यात तापाचे सात रुग्ण आढळले. सुमारे ५६८ घरांची पाहणी करून चार घरांमधून डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्यांची उत्पत्तिस्थाने नष्ट केली. २३० पाण्याच्या टाक्यांच्या तपासणीत चार टाक्यांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. त्या परिसरातील १०५४ घरांमध्ये धूरफवारणी करण्यात आली.

गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ९३ होती. या वर्षी मात्र ती १५० पर्यंत पोहोचली आहे. संशयित डेंग्यूच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षी १९३६ होती. या वर्षी ती सुमारे अडीच हजारापर्यंत पोहोचली आहे.

डेंग्यूची लक्षणे

  • कातडीवर लाल पुरळ येणे
  • नाक किंवा तोंडातून रक्तस्राव होणे
  • दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे
  • उलटय़ा, पोटदुखी, डोकेदुखी

काय काळजी घ्याल?

  • भरपूर पाणी पिणे आणि आराम करणे
  • डासांचा प्रतिबंध करणे
  • अंगभर कपडे घालणे
  • मच्छरदाणीचा वापर करणे
  • घराजवळील परिसर स्वच्छ ठेवणे
  • जुने टायर, थर्माकोलचे खोके, नारळाच्या करवंटय़ा घरातून काढून टाकणे.

लेप्टोचा संसर्ग

ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवडय़ामध्ये लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १८ वर गेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती वाढली आहे. कुर्ला भागातील ७ वर्षीय मुलाचा आणि ३५ वर्षीय पुरुषाचा लेप्टोने मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर पालिकेने ११२० घरांचे सर्वेक्षण केले. त्यात तापाचे तीन रुग्ण आढळले. उंदरांची ७४ बिळेही नष्ट केली. यंदा लेप्टोने ११ जण दगावले आहेत. मलेरियाच्या रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढली नसली तरी या वर्षी ऑगस्टमध्ये मलेरियाने दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 2:05 am

Web Title: dengue in mumbai 2
Next Stories
1 रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या ब्लॉक
2 म्हाडाच्या मार्गदर्शन शिबिरात उमेदवारांची गैरसोय
3 महामंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्यांना मुहूर्त!
Just Now!
X